अन्न-नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांची माहिती
बेळगाव : अपात्र असणारेदेखील बीपीएल रेशन कार्डांचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. ग्राम पंचायत पातळीवर दस्तऐवज जमा करून पात्र असणाऱ्यांनाच बीपीएल रेशन कार्डाचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य के. ए. तिप्पेस्वामी यांच्यासह इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुनियप्पा यांनी उत्तर दिले. राज्यात 65 ते 75 टक्के लोकसंख्या दारिद्र्यारेषेखालील आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. आणखी वेळ घेऊन बीपीएल कार्डधारकांना त्रास होणार नाही, अशा रितीने अपात्र असणाऱ्यांची बीपीएल कार्डे एपीएलमध्ये परिवर्तीत केली जातील, असे त्यांनी सांगितले.
लवकरच नियमानुसार पुढील कार्यवाही
सध्या असणाऱ्या बीपीएल कार्डधारकांमध्ये 20 टक्के कुटुंबीय एपीएल कार्डासाठी पात्र असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पडताळणी करून लवकरच नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. पात्र बीपीएल कार्डधारकांची कार्डे रद्द होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. पात्र असूनही बीपीएल कार्डे रद्द झाली असतील तर त्यांना पुन्हा कार्ड मिळवून दिले जाईल. सर्वांनी नि:पक्षपातीपणे सहकार्य केल्यास कार्डांचे पडताळणी कार्य यशस्वी होईल, असे स्पष्टीकरणही मुनियप्पा यांनी दिले.









