मनपा कार्यालयातील प्रकार : सेवा केंद्रांतून एजंट दाखले आणून देत असल्याचे उघड
प्रतिनिधी /बेळगाव
जन्म आणि मृत्यू दाखले महापालिकेतून देण्यात येत होते. मात्र सेवा केंद्रावर दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरीदेखील काही नागरिक महापालिका कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी येत आहेत. मात्र त्या ठिकाणी काही एजंट जास्त पैसे घेऊन परिसरात असलेल्या सेवा केंद्रांतून दाखला आणून देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जन्म व मृत्यूची नेंद करण्यासाठी शहरातील रुग्णालयांना लॉग ईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जन्म-मृत्यूची नोंद करण्याचा महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांवरील भार कमी झाला आहे.
महापालिकेच्या स्मशानभूमीद्वारे उपलब्ध असलेल्या मृत्यूच्या नोंदी महापालिकेच्या कर्मचाऱयांना कराव्या लागतात. तर रुग्णालयाद्वारे जन्म-मृत्यूची माहिती अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची चाचपणी करून मंजुरी द्यावी लागते. मात्र जन्म-मृत्यू दाखल्याच्या मंजुरीसाठी 20 रुपयांची आकारणी केली जात आहे. पण नागरिकांना दाखले दिले जात नाहीत.
एजंटराजचा सुळसुळाट वाढला
जन्म-मृत्यू दाखले सेवा केंद्रांवर उपलब्ध करण्यात आले आहेत. तरीदेखील दाखले मिळविण्यासाठी नागरिक महापालिका कार्यालयात येत आहेत. पण या ठिकाणी केवळ अर्ज घेऊन नागरिकांना दाखल्याचा नोंदणी क्रमांक दिला जातो. याकरिता 20 रुपयांची आकारणी करण्यात आली आहे. मात्र दाखले घेण्यासाठी पुन्हा सेवा केंदांवर जावे लागत आहे. जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी 20 ते 30 रुपये मोजावे लागत आहेत. तसेच महापालिका कार्यालयात काही एजंट ठाण मांडून बसत असून दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून मोठय़ाप्रमाणात रक्कम घेत
आहेत.
दाखल्यासाठी 50 ते 60 रुपये आकारणी
एका जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी 50 ते 60 रुपये घेऊन परिसरात असलेल्या सेवा केंद्रांवरील दाखले उपलब्ध करून देत आहेत. महापालिकेने जन्म-मृत्यू दाखले देण्याचे बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात सर्वत्र दाखले देण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली असली तरी दाखले घेण्यासाठी नागरिक महापालिका कार्यालयात येत आहेत. पण या ठिकाणी नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यालयात येणाऱयांना दाखले देऊन आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.









