नवी मुंबईचे शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक किशोर पाटकर यांचा दानशूरपणा
वार्ताहर/ कुडाळ
गावातील श्री देव रवळनाथाच्या दर्शनासाठी आलेलो. परंतु येथे आलो आणि माझ्या हातून चांगले कार्य घडले. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना काही तरी मदत करावी, हाच विचार माझ्या मनात सतत घोळत होता. नवी मुंबई येथे सव्वा दोन हजार लोकांना आपण मोफत घरे मिळवून दिली. यापुढेही सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी सधन होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, अशी ग्वाही शिंदे गटाचे नवी मुंबईचे शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक किशोर पाटकर यांनी पाट येथे दिली.
एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित, एस.एल. देसाई विद्यालय पाट व कै. एस.आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयात शिंदे गटाचे नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख व नगरसेवक किशोर अशोक पाटकर पुरस्कृत च्या वतीने पाट हायस्कूल मधील शंभर गरीब विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.विद्यालयाच्या वतीने किशोर पाटकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रशालेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांचा शाळा ते घर असा प्रवास सुखकर व्हावा. विद्यार्थ्यांचा वेळ वाचून तो वेळ त्यांनी अभ्यासात घालवावा या उद्देशाने पुरस्कर्ते व कार्यक्रमाचे प्रमुख किशोर पाटकर, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक वैभव भोर, वाशी उपशहर प्रमुख महेश परब, व्यावसायिक विवेक अणावकर व अभय परुळेकर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थी रामदास मोर्यै याने सादर केलेल्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक शामराव कोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांनी ढोलताशाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. नवी मुंबई येथून चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दानशूर, राजकारण व समाजकारणाची आवड असलेले, कार्यकर्तृत्ववान, स्वच्छता उपक्रम प्रमुख, घरबांधणी, आश्रमशाळा व अनाथ मुलांचे आधारस्तंभ, संत गाडगेबाबा, व महाराष्ट्र राज्य 2023 ‘सकाळ सन्मान’ पुरस्कार प्राप्त अशा शब्दात किशोर पाटकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा राजेश सामंत यांनी गौरव केला. आमच्या शाळेवर तुमची कृपादृष्टी व प्रेम असेच राहू दे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वैभव भोर, महेश परब, विवेक अणावकर ,अभय परुळेकर, संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, संस्थापदाधिकारी देवदत्त साळगावकर , राजेश सामंत, सुभाष चौधरी नारायण तळावडेकर, दीपक पाटकर आदी विद्यार्थी शिक्षक कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऋतुजा वायंगणकर, कृतिका परब, स्नेहा करलकर, पूजा मार्गी, निमिषा कोचरेकर, सिद्धार्थ करलकर ,सुयश गोसावी ,वेदिका नार्वेकर या गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल लाभार्थी विद्यार्थीनी वेदिका नार्वेकर हीने मनोगत व्यक्त केले.
दिगंबर सामंत म्हणाले, दातृत्व गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना जेव्हा मनात येते तेव्हा समाजकार्य होते. शिक्षण क्षेत्रात जे तुम्ही काम करत आहात त्यासाठी परमेश्वर तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना अधिक बळ देईल. सायकल ही गरजू मुलांना मिळालेली फार मोठी अनमोल वस्तू आहे. त्याचा योग्य वापर करा, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शामराव कोरे यांनी केले. सूत्रसंचालन जानह्वी पडते व सद्गुरू साटेलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी मानले.









