महापालिकेकडून कुमार गंधर्व रंगमंदिरात व्यवस्था, मिळकतीधारकांची होतेय गर्दी
बेळगाव : राज्य सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने मिळकतींची ए आणि बी खात्यांतर्गत नोंदणी करून घेतली जात आहे. महापालिकेकडे गेल्या आठ दिवसांत अर्ज केलेल्या तब्बल 240 मिळकतींना ए व बी खाताअंतर्गत उताऱ्यांचे वितरण करण्यात आले आहे. सोमवारी मेळाव्यानंतरही 40 मिळकतींना उतारे देण्यात आले असून या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत महसूल जमा होत आहे. यासाठी तीन महिन्यांची मुदत असल्याने मिळकतींची नोंद करून घेण्यासाठी कुमार गंधर्व रंगमंदिरात मिळकतधारकांची मोठी गर्दी होत आहे. अनधिकृत मिळकतींची नोंद करून घेऊन त्यांना बी खाते उपलब्ध करून देण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी बेळगाव महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्या दिवसापासूनच महापालिकेच्यावतीने ए व बी खात्यांतर्गत नोंदणी करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सोमवारी महापालिकेच्यावतीने ए आणि बी खाता मेळाव्याचे कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते शहर, उपनगरातील 200 मिळकतीधारकांना ए व बी उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. मेळाव्यानंतर सोमवारी दिवसभर 38 मिळकतींना ए खाता तर दोन मिळकतींना बी खाता अशा एकूण 40 मिळकतींना उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. आठ दिवसांत महापालिकेच्यावतीने तब्बल 240 मिळकतींची ए व बी खात्यांतर्गत नोंदणी करून घेऊन संबंधित मिळकतीधारकांना उताऱ्यांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेत गर्दी होऊ नये यासाठी नजीकच्या कुमार गंधर्व रंगमंदिरात 40 कॉम्प्युटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मिळकतींची नोंद करण्यासाठी गर्दी होत आहे.
मेळाव्यावेळी 200 मिळकतीधारकांना उतारे
राज्य सरकारच्या आदेशानुसार मिळकतींना ए आणि बी खात्यांतर्गत नोंद करून घेऊन त्यांना उताऱ्यांचे वितरण केले जात आहे. सोमवारी पार पडलेल्या मेळाव्यावेळी 200 मिळकतीधारकांना ए व बी खात्यानुसार उतारे देण्यात आले.
– रेश्मा तालिकोटी, महसूल उपायुक्त









