लोककल्प, लोकमान्य सोसायटी, कॅनरा बँक यांचा संयुक्त उपक्रम
► प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर तालुक्यातील अनेक दुर्गम गावे आहेत, जेथे वाहतुकीची साधने व अन्य सुविधा अद्याप पोहोचल्या नाहीत. अशा गावांमधील ग्रामस्थांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लोककल्प फौंडेशन अनेक उपक्रम राबवत आहे. कणकुंबी भागातील गावांमधून अनेक विद्यार्थी दररोज पायी प्रवास करून शाळेत येतात. हे लक्षात घेऊन लोककल्प, लोकमान्य सोसायटी व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 50 विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होणार असून त्यांनी हा वेळ अभ्यासासाठी द्यावा आणि उत्तम शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, अशी अपेक्षा लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित यांनी व्यक्त केली.
लोककल्प फौंडेशनने कणकुंबी भागातील आठवी ते दहावीपर्यंतचे जे विद्यार्थी 8 ते 10 कि.मी. चालत शाळेला येतात, अशा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यापैकी 50 विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेच्या सहकार्याने सायकली देण्यात आल्या. तळावडे, चोर्ला, हुळंद, गवळीवाडा येथून हे विद्यार्थी चालत शाळेत येत होते. शिवाय हा जंगल परिसर असल्याने विद्यार्थ्यांना हिंस्त्र प्राण्यांचा धोकाही होता. फौंडेशनने गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पहिल्या टप्प्यामध्ये 50 विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेच्या सहकार्याने सायकली दिल्या.
कणकुंबी येथील माऊली विद्यालयात सायकल वितरणाच्या कार्यक्रमात अभिजित दीक्षित बोलत होते. या प्रसंगी कॅनरा बँकेचे डिव्हीजनल मॅनेजर राशिद, सिनिअर मॅनेजर समाधान घोंघाणे, मार्केटिंग मॅनेजर राहुल, लोककल्पचे संचालक कॅप्टन नितीन धोंड, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील, फौंडेशनच्या सीआरएस मॅनेजर मालिनी बाली आदी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेच्यावतीने मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी स्वागत करून परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना एम. एन. कुलकर्णी म्हणाले, लोकमान्य सोसायटी व लोकमान्य फौंडेशनने या भागातील गरीब विद्यार्थ्यांना सायकलीच्या रुपाने मदत करण्याची संधी कॅनरा बँकेला उपलब्ध करून दिली, याबद्दल आम्ही या संस्थांबद्दल कृतज्ञ आहोत.
सी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन ज्ञान आपल्या सोबत चिरंतन टिकणार आहे, असे सांगितले. कॅप्टन नितीन धोंड यांनी ‘तरुण भारत’, ‘लोकमान्य सोसायटी’ व फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी सोसायटीचे रिजनल मॅनेजर जयराम बेळवटकर, फौंडेशनचे कार्यकर्ते संतोष कदम, सुरजितसिंग रजपूत, अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर, प्रितेश पोतेकर, लोकमान्यच्या सोशल मीडिया प्रमुख वैष्णवी उसुलकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.









