वृक्षारोपणाकडे कल : विविध जातीची 14 हजार रोपे उपलब्ध : शेतकरी, स्वयंसेवी संघटनांचा प्रतिसाद : येत्या काळात सर्वत्र हिरवाई पसरणार
बेळगाव : पावसाला सुरुवात झाल्याने वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध ठिकाणी रोपे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. वनखात्याच्या मच्छे येथील नर्सरीतून साडेतीन हजार रोपांचे वितरण करण्यात आले आहे. एकूण 14 हजार 700 रोपे वितरित केली जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत साडेतीन हजार रोपांचे वितरण झाले आहे. शेतकरी, स्वयंसेवी संघटना आणि इतर संस्थांना ही रोपे माफक दरात देण्यात आली आहेत. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने रोप लागवडीचे काम थांबले होते. मात्र, आता किरकोळ प्रमाणात पाऊस होऊ लागल्याने विविध ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी, स्वयंसेवी संघटना आणि इतर नागरिकांकडून रोप खरेदीला प्रतिसाद वाढू लागला आहे. या नर्सरीतून सागवान, शिसम, लिंबू, कढीपत्ता, जांभूळ, पेरू आदी रोपे सवलतीच्या दरात वितरित केली जात आहेत. वनखात्याच्या रोपवाटिकेत रोपे तयार होत असल्याने ती चांगल्या प्रतीची आहेत. त्यामुळे विविध ठिकाणांहून नागरिकही येऊ लागले आहेत. विशेषत: स्वयंसेवी संघटना मोठ्या प्रमाणात रोपांची खरेदी करून लागवड करू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्वत्र हिरवाई पसरणार आहे.
एकूण 14 हजार 700 रोपे वितरित केली जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 3500 रोपे वितरित केली आहेत. शेतकरी शेतीचा उतारा, आधारकार्ड देऊन सवलतीच्या दरात रोपांचा लाभ घेऊ शकतात. पावसाला सुरुवात झाल्याने मागणी वाढू लागली आहे. विविध जातींची रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत.
– सुभाष शिरखाने (डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर, मच्छे)









