पोलिसांनी दोन्ही गटांना बोलावून समज दिली
मडगाव : गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऊमडामळ पंचायत ज्यांच्या हातात गेली आहे ते जातीय तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत. या पूर्वी रूमडामळ पंचायतीत असा प्रकार कधीच घडला नव्हता. मात्र, आत्ता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे या पंचायतीचे पंचायत मंडळ त्वरित बरखास्त करावे अशी मागणी याच पंचायतीचे पंच सदस्य विनायक वळवईकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. पंच सदस्य विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री 10.30च्या दरम्यान रूमडामळ परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पंचायत क्षेत्रातील कथित बेकायदा मदरसा संदर्भात श्री. वळवईकर यांनी आवाज उठविल्याने, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रूमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रात शांतता कायम राखण्यासाठी काल सोमवारी पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांना बोलावून घेऊन त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी समज दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली. रूमडामळ पंचायत क्षेत्रात हिंदू-मुस्लिम यांच्या जातीय तेढ किंवा भेदभाव नव्हता. गेली कित्येक वर्षे हिंदू-मुस्लिम यांचे संबंध चांगले होते. पण, गेल्या पंचायत निवडणुकीनंतर पंचायत क्षेत्रातील वातावरण बिघडू लागल्याचे पंच सदस्य विनायक वळवईकर म्हणाले. पंचायत परिसरात जी बेकायदेशीर कृत्ये सुरू आहेत, त्यांना पंचायतीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
परवानगी न घेताच पंचायत क्षेत्रात बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे बंद करण्यासाठी पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची दखल घेऊन पंचायत मंडळ बरखास्त करावे अशी मागणी श्री. वळवईकर यांनी केली आहे. जोपर्यंत परिसरातील बेकायदेशीर कृत्यांना आळा बसत नाहीत, तोपर्यंत ही तेढ कायम राहील असे ते म्हणाले. पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे, बेकायदेशीर स्क्रेपयार्ड, गोंमास विक्री दुकानासारखे धंदे हे प्रमुख कारण आहे. शिवाय त्यामुळे अऊंद रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शंभर चौरस मीटर जागेत तीन मजली इमारती उभ्या होतात, त्याला काय म्हणायचे. ज्या घरांमध्ये बेकायदेशीर मदरसा सुरू आहे, तो बंद करावा. दोन महिन्यापूर्वी पंचायतीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता. अजूनही या मदरसा बंद करण्याची नोटीस पाठविण्यात आलेली असेही विनायक वळवईकर म्हणाले. पंचायत परिसरात गेले काही दिवस बॅनर्स फाडणे, बसची तावदाने फोडणे, चाकूने हल्ला करणे या सारख्या घटना घडलेल्या आहेत. त्यासाठी त्या परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. काल सोमवारी ऊमडामळ येथील दोन्ही गटांतील प्रतिनिधींना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांना समज देण्यात आली आहे. रूमडामळ-दवर्ली परिसरात सद्या तणावपूर्वक शांतता आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.
संशयिताला दोन दिवसांची कोठडी
रूमडामळ-दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला संशयित आरोपी आयुब खान याला काल मडगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान, वळवईकर यांना समाज माध्यमावरून धमकी दिल्याचा आरोप असलेल्या वास्को येथील अब्दुल रझाक यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात स्वता लक्ष घातले असून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यावर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.









