केवळ 200 मीटर रस्त्याचीच दुरुस्ती का? : संपूर्ण रस्ता करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
रामघाट रोड ते बेळगाव-वेंगुर्ला रोडला जोडणाऱ्या पाईपलाईन रोडची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. संपूर्ण रस्त्याचा विकास करणे आवश्यक असताना केवळ 200 मीटर अंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ठरावीक भागाच्या रस्त्याची दुरुस्ती का केली जात आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पाईपलाईन रोड महत्त्वाचा असून, रामघाट रोडवरून हिंडलगा, विजयनगर आणि बेळगाव-वेंगुर्ला रोडला येण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ नेहमी असते. विजयनगर, रक्षक कॉलनी, विनायकनगर, शिवगिरी कॉलनी, डिफेन्स कॉलनी, धन्वंतरी कॉलनी, बुडा कॉलनी अशा विविध परिसरातील रहिवाशांना हा रस्ता गरजेचा आहे. मात्र हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून, मोठमोठे ख•s निर्माण झाले आहेत.
गणेशोत्सवादरम्यान ख•dयांमध्ये पेव्हर्स घालून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पेव्हर्स उखडले आहेत. त्यामुळे रस्ता खूपच खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केवळ 200 मीटर रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येत आहेत. याची सुरुवात रामघाट रोड किंवा बेळगाव-वेंगुर्ला रोडच्या बाजूने करण्याऐवजी धन्वंतरी कॉलनीजवळ पेव्हर्स घातले जात आहेत. हा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला असताना केवळ मधल्या ठिकाणी, तसेच मोठमोठी अपार्टमेंट असलेल्या ठिकाणीच रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
ठरावीक ठिकाणीच रस्ता करण्यामागचा उद्देश काय?
काही ठरावीक ठिकाणांच्या रस्त्याचा विकास करण्यामागचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रामघाट रोड येथील मारुती मंदिर परिसरातही रस्ता खराब झाला आहे. मारुती मंदिरपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक होते. पण याकडे दुर्लक्ष करून मधोमध रस्ता केला जात असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









