पिंपरी / वार्ताहर :
अकोला येथे जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पोलीस सतर्क होते. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे. जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी येथे दिला. काही लोक, संस्था जाणीवपूर्वक अशाप्रकारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहेत. आग लावून या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, अकोल्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेवगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. अकोल्यात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात काही संस्था, लोक यामध्ये सामील आहेत. शंभर टक्के कोणाची फूस असल्याशिवाय असे प्रकार होत नाहीत. मात्र, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना, दंगल घडविणाऱ्यांना कायमची अद्दल घडवली जाईल.
पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे अकोला शहरात आता पूर्ण शांतता आहे. या प्रकारचे कोणतेही कृत्य यापुढे घडणार नाही, यासाठी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.








