रस्त्याच्या कारणातून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणाच्या टोळीने नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत निर्माण केली
मिरज : शहरातील मंगळवार पेठ येथे वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणातून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर तरुणाच्या टोळीने नंग्या तलवारी नाचवून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सहा जणांना ताब्यात घेतले. याबाबत रफिक मौला मकानदार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. याबाबत माहिती अशी, मंगळवार पेठेतील माळी गल्ली येथे रफिक मकानदार आणि संशयित खंडेश साळुंखे हे शेजारीशेजारी राहतात. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्यावऊन वाद असून, सदरचा वाद न्यायप्रविष्ठ आहे.
याच कारणातून शनिवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संशयित खंडेशने आपल्या अन्य साथीदारांना बोलावून घेऊन रफिक मकानदार यांना धमकावले. या तरुणांनी भांडण आणि वादावादीवेळी नंग्या तलवारी नाचवून दहशत निर्माण केली. तसेच रफिक मकानदार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित खंडेश साळुंखे, संभाजी, मयुर, प्रसन्न, शंकर, निरंजन (पूर्ण नाव समजू शकली नाही) अशा सहा जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिराने रफिक मकानदार यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.








