ड्रग्स व्यवसाय वाढण्यमागे अधिकारीच कारणीभूत : विजय
पणजी : गोवा पोलीस महासंचालक जसपाल सिंग हे राज्यातील ड्रग्स (अमलीपदार्थ) व्यवसायावर पांघऊण घालू पाहत आहेत. प्रत्यक्षात गोवा ही देशातील अमलीपदार्थांची राजधानी होण्याच्या वाटेवर आहे, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केल्यामुळे पोलीस महासंचालक व आमदार सरदेसाई यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अमलीपदार्थांशी संबंधित समस्यांचे मूळ शोधण्यात गोवा पोलिसांना सातत्याने अपयश येत असतानाही महासंचालक आपल्या नम्रतेच्या बुरख्याखाली वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. गोव्यातील गुह्यांमध्ये घट झाल्याची ग्वाही देणारे महासंचालकांचे विधान हा गोव्यातील गुह्यांची प्रत्यक्षात असलेली तीव्रता लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठीचा प्रयत्न आहे. गोवा हे असे राज्य आहे, जिथे क्षुल्लक बाबींवरून बंदुकीचा वापर कऊन हिंसाचार किंवा क्रूर हत्या होत नाहीत. मात्र आता अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. ही परिस्थिती असे सूचित करते की गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही.
या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याऐवजी, महासंचालक जी विधाने करत आहेत त्यामुळे गुन्हेगारांना आणखी घृणास्पद गुन्हे करण्यासाठी अधिक उत्तेजन मिळण्याची शक्यता आहे, अशी भीतीही विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. आपण पोलीस महासंचालकांना आठवण करून देऊ इच्छितो की आपण लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी आहे. त्यांच्या समस्या मांडण्याची आणि त्यांच्या हिताची वकिली करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. राज्यातील गुह्यांवर कारवाई करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि महासंचालकांच्या अहंकारामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीत अडथळा निर्माण करणे राज्याला परवडणारे नाही. आपण मांडलेला कोणताही सल्ला किंवा सूचना आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकांच्या चिंतेतून आहे. आपण जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतो तेव्हा लोकांच्या सामूहिक इच्छेचा विचार करणे आणि त्यानुसार वागणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
पोलिसांना कुणी सल्ला देऊ शकत नाही
‘एक्स’ या समाज माध्यमावरून गोवा हे देशातील अमलीपदार्थ विक्रीचे केंद्र झाले आहे. गोवा पोलिसांनी ते मान्य केले पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यावर पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी आमदार सरदेसाई यांचे नाव न घेता पोलिसांना कुणीही सल्ला देऊ शकत नाही, असा दावा केला होता.









