संविधान समर्पणदिनी व्यक्त केला संताप : डॉ. आंबेडकर-शिवरायांचे शिल्प उभारणीकडे दुर्लक्षच
बेळगाव : संविधान समर्पणदिन असल्याने रविवारी सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तसेच पुतळ्याचे पूजन केले जात होते. परंतु दुसरीकडे बेळगाव रेल्वे स्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प मागील वर्षभरापासून बसविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिल्प आहे तसेच ठेवल्याने त्यांना तडे जात असून रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे या थोर व्यक्तींचा अवमान होत आहे. यामुळे दलित संघटना तसेच शिवप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केल्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बेळगाव परिसरात कार्य केलेल्या थोर व्यक्तींची शिल्प व त्यांची माहिती रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प जाणुनबुजून अडगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच बेळगावमधील शिवप्रेमी व दलित संघटनांनी एकत्रितरित्या भव्य आंदोलन केले. श्रीराम सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसन्मान पदयात्राही काढण्यात आली. शिवप्रेमी व भीमसैनिक एकवटल्याने रेल्वे प्रशासनाने शिल्प बसविण्याचे मान्य केले. त्यावेळी अडगळीत असलेले शिल्प काढून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारा शेजारी तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यात आले. महिन्याभरात हे शिल्प योग्य जागी लावण्यात येईल, असे सांगण्यात आले. या घटनेला आता अनेक महिने उलटले तरी अद्याप शिल्प बसविण्यात आलेले नाही. तसेच त्यांची योग्य व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. स्वच्छता होत नसल्याने शिल्प धुळीने माखले असून या सर्व प्रकारामुळे संतापाची लाट पसरली आहे.
शिल्प न बसविल्यास आंदोलन छेडणार…
संविधान समर्पणदिन असल्याने जगभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जात आहे. परंतु बेळगावमध्ये मात्र बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्प बसविण्यात आली नसून हा एक प्रकारचा अवमानच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचे भाग एकमेकांपासून वेगळे होत असून हे अतिशय दुर्दैवी आहे. येत्या आठ दिवसात रेल्वे प्रशासनाने शिल्प न बसविल्यास भीमसैनिक व शिवप्रेमी एकत्रितरित्या मोठे आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.
– मल्लेश कुरंगी (दलित नेते)









