खानापुरातील शंभर खाटांच्या हॉस्पिटलचे घिसाडघाईने
प्रतिनिधी /खानापूर
येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या शंभर खाटांच्या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात होणारी घिसाडघाई पाहता बांधकामाबाबत साशंकता निर्माण होत आहे. दवाखान्यासमोर बांधण्यात येत असलेली संरक्षक भिंत अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून पाया न खणता बांधल्याने भविष्यात धोकादायक ठरु शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दवाखाना इमारतीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी महिलांसाठी अद्ययावत दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून हा दवाखाना मंजूर करून घेतला. यासह नव्याने शंभर खाटांच्या दवाखान्याला मंजुरी मिळाली असून यासाठी 32 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सध्या सुरू असलेले काम अत्यंत घिसाडघाईत रात्रंदिवस सुरू आहे. बांधकाम झाल्याझाल्याच गिलावा व चुना पॉलीश करण्यात येत आहे.
दवाखान्याच्या इमारतीसमोरील जुना संरक्षक कठडा पाडवण्यात आला असून त्या ठिकाणी नव्याने बांधण्यात येत आहे. या भिंतीसाठी साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले आहे. नव्याने पायाखोदाई न करता जुन्याच पायावर ही संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. त्यामुळे या भिंतीच्या टिकाऊपणाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. अशा कमकुवत संरक्षक भिंती पडून विपरित घडल्याच्या घटना अनेक आहेत. दवाखाना सुरू झाल्यावर महिला व बालकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे काही धोका घडल्यास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराकडून उद्धट उत्तरे

संपूर्ण दवाखाना इमारतीचे बांधकाम अत्यंत घाईगडबडीत करण्यात आले आहे. बांधकामाला पाणी न मारताच गिलावा, टाईल्स बसवणे, चुना पॉलीश ही कामे घिसाडघाईने झाल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उत्पन्न होत आहे. संरक्षक कठडय़ाचीही तीच अवस्था आहे. यापूर्वी सिंडिकेट बँकेची संरक्षक भिंत पडून मोठी दुर्घटना घडली होती. भविष्यात या दवाखान्यात रुग्णांची गर्दी होणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका होण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता ही संरक्षक भिंत मी माझ्या खर्चाने बांधतो आहे, असे उद्धट उत्तर देण्यात येत आहे.
– रुक्माण्णा झुंजवाडकर, ग्रा. पं. सदस्य
निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणूनही कारवाई नाही

तालुक्यात विकासाच्या नावाने नवनवीन योजना आणण्यात येत आहेत. मात्र कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण होत आहे. बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे काम स्वतः निदर्शनास आणून दिले. पण यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या या दवाखान्याबाबत मी वेळोवेळी प्रश्न उभे केले आहे. बांधकामादरम्यान होत असलेली घिसाडघाई व पाया नसताना पूर्वीपेक्षा उंच बांधण्यात येणारा कठडा हेदेखील धोकादायकच आहे. या ठिकाणी गर्भवता, बाळंतिण व बालके उपचारासाठी येणार आहेत. परंतू संरक्षक भिंतीमुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
-विनायक मुतगेकर, अध्यक्ष ग्रा. पं. सदस्य संघटना









