संत तुकाराम ह्यांनी धर्माचा प्रचार करताना धर्माच्या नावाने ज्या अंधश्र्रद्धा समाजामध्ये प्रचलित होत्या त्याबद्दल तत्कालीन तथाकथित धार्मिक व्यक्तींचा रोष पत्करून प्रामाणिक लोकांना गीता-भागवतनुसार धर्म म्हणजे काय याची शिकवण दिली. समाजामध्ये अंधश्र्रद्धा निर्मूलन करणे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर लोक नास्तिक, अधार्मिक, पापी आणि ध्येयहीन जीवन जगू नये आणि मनुष्य जीवन व्यर्थ जाऊ देऊ नये यासाठी काळजी घेणेही जऊरीचे आहे. अंधश्र्रद्धा निर्मूलन करताना प्रामाणिक श्र्रद्धेचेही निर्मूलन होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपल्या अभंगातून अंधश्र्रद्धा दूर करून प्रामाणिक धर्माचे पालन कसे करावे हे तुकाराम महाराज शिकवीत आहेत.
एका अभंगात ते म्हणतात वैद्य वाचविती जिवा। तरी कोण ध्यातें देवा ।।1।। काय जाणो कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ।।2।। अंगी दैवत संचरे । मग तेंथें काय उरे ।।3।। नवसें कन्यापुत्र होती । तरी कां करणें लागे पती ।।4।। जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ।।5।।
अर्थात, “वैद्य औषधाने जीव वाचवीत असते तर देवाचे ध्यान कोणी केले असते. प्रारब्धामध्ये जे आहे तसे होईल असे असले तरी खरोखर काय घडेल ते समजत नाही. अंगी दैवत संचरत असेल तर मग तेथे काय कमी राहते. जर नवसाने कन्या किंवा पुत्र होत असेल तर, पती करण्याची गरज काय. तुकारामाचा स्वामी श्रीविठ्ठल हाच यातील खरे रहस्य जाणतो.”
या अभंगात कांही उदाहरणावरून हे पटवून देण्यात आले आहे की, कर्म, प्रारब्ध, दैवी शक्ती हे सामान्य माणसाला समजणे कठीण आहे. समाजात देखील आपण पाहतो की चांगली कर्मे करूनसुद्धा मनुष्याला वाईट परिणाम भोगावे लागतात, आणि वाईट कर्मे करणाऱ्यांना चांगली फळे प्राप्त होतात. हे सामान्य माणसाला गोंधळून टाकणारे आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात माझा स्वामी श्रीविठ्ठल मात्र याचे रहस्य जाणतो. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल भगवत गीतेत हे रहस्य उलगडून सांगतात (भ. गी. 4.17 ) गहना कर्मणो गती: अर्थात कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी कर्माची सिद्धी कशी होते हे रहस्य भगवान श्रीकृष्णाकडूनच समजून घेतले पाहिजे. (भ. गी. 18.13) पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ।।
“हे महाबाहू अर्जुन, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची पाच कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे.” ( भ. गी. 18.14) अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्वधिम् ।विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।। अर्थात “कर्माचे स्थान (शरीर) कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा – ही पाच कारणे होत.” (भ. गी. 18.16) तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु य: । पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मति: ।। अर्थात “म्हणून या पाच कारणांचा विचार न करता, ज्याला वाटते की, तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टीना यथार्थ रूपात पाहू शकत नाही.” जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण कसे अंतिम नियंत्रक आहेत हे आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण गोंधळलेल्या अवस्थेतच राहू. यासाठी नित्य भगवद्गीतेचे पठण आवश्यक आहे.
पितरांचे ऋण फेडणे, पिंडदान, श्राद्ध याविषयी बोलताना महाराज म्हणतात भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंडदान ।।1।। हे तो चाळवाचाळवी । केले आपणचि जेवी ।।2।। नैवेद्याचा आळ । वेचे ठाकणीं सकळ ।।3।। तुका म्हणे जड । मज न राखावे दगड।।4।।
अर्थात “व्यक्ती जीवंत असताना त्याला भूक लागल्यावरही अन्न देत नाही पण जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा मात्र पिंडदान करतात. हे प्रकार म्हणजे स्वत:चीच फसवणूक आहे कारण श्राद्धाकरिता शिजविलेले अन्न हे स्वत:साठीच असते. लोक देवाच्या नावाने नैवेद्याकरिता चांगली पक्वान्ने करतात पण ती स्वत:चे पोट भरण्याकरिताच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, मला या लोकांप्रमाणे जडबुद्धीचा ठेवू नका. आणखी एका अभंगात म्हणतात पिंड पदावरी ।दिला आपुलिया करी ।।1।। माझे झाले गयावर्जन । फिटले पितरांचे ऋण ।।2।। केले कर्मांतर । बोंब मारिली हरिहर।।3।। तुका म्हणे माझे । भार उतरले ओझे ।।4।।
अर्थात “मी माझा देह श्रीहरीच्या चरणांवर ठेवला आहे त्यामुळे गया येथे जाऊन पितरांचे ऋण फेडावयाचे असते अशी कार्ये आपोआप झाली आहेत. हरी हर या पवित्र नामाचा जप केल्याने सर्व कर्मकांड केल्यासारखे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या हरिशरणागतीने माझे सर्व कर्मकांडाचे ओझे उतरले आहे. पुढील अभंगात आपला देहच कसा पिंड आहे आणि तो भगवंताच्या चरणी अर्पण केल्यानेच खरे पिंड दान कसे होते याचे वर्णन करताना महाराज म्हणतात.
पिंडदान पिंडे ठेविले करून । तिळी तिळवण मूळत्रयी ।।1।। सरिले संकल्प एकाचि वचनें । ब्रम्ही ब्रम्हपणें सेवटीच्या ।।2।। सव्य अपसव्य बुडाले हे कर्म । एका एक वर्म एकोविष्णू ।।3।। पित्या पुत्राचें झाले अवसान । जनी जनार्दन अभेदेसी ।।4।।आहे तैसी पूजा पावलें सकळ । सहज तो काळ साधियेला ।।5।।तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार । आता नमस्कार शेवटीचा ।।6।।
अर्थात “मी माझ्या देहाचा पिंड विष्णुपदाला अर्पण केला आहे आणि अहंकार, महततत्व, अज्ञान या तीन मूळत्रयांना तिलांजली दिली आहे, आणि ब्रम्हार्पण या एकाच संकल्पाने सर्व कर्म नाहीसे केले. सर्व जग विष्णुमय आहे हे समजल्याने माझे सव्य अपसव्य कर्म करण्याचे संपले. जनार्दनानीच सर्व कांही व्यापले आहे हे अभेदतत्व समजून आल्याने पितापुत्र इत्यादी मर्यादित नाती आणि त्यांचा अभिमान नाहीसा झाला. शास्त्रात जी पिंडपूजा सांगितली आहे ती मी अशाप्रकारे साधली, त्यामुळे मला श्राद्धाचा पर्वकाळ सहज साध्य झाला. तुकाराम महाराज म्हणतात, या पिंडदानाने सर्व कुळांचा उध्दार मी केला, आता त्या जनार्दनाला माझा शेवटचा नमस्कार.”
हरिभक्तीमध्ये संलग्न झाल्याने कर्मकांडातील फायदे आपल्याला निश्चित होतातच पण त्याचबरोबर हरीच्या चरणांचा आश्र्रयही प्राप्त होतो, ज्यामुळे या भौतिक जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात (भ. गी. 8.28 )
वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्। अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ।।
अर्थात “जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म करण्यापासून जे फळ प्राप्त होते त्या फळापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम, शाश्वत धामाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत मध्येही असेच वर्णन येते. जो भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे त्याला इतर कोणतेही कार्य करण्याची गरज नाही
देवर्षिभूताप्तनृणां पितृणां न किङ्करो नायमृणी च राजन् । सर्वात्मना य: शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ।। ( भा. 11.5.41)
अर्थात “हे राजन, ज्या मनुष्याने सर्व भौतिक कर्तव्याचा त्याग करून आखिलांना आश्र्रय प्रदान करणाऱ्या भगवान श्रीमुकुंदाच्या पदकमळांचा आश्र्रय घेतला आहे, तो देव, ऋषीमुनी अन्य जीव, नातलग, मित्र मनुष्य समाज किंवा पितरांचा देखील ऋणी राहत नाही. हे समस्त जीव भगवंताचे अंश असल्यामुळे संलग्न असलेल्या व्यक्तीला या सर्वांची वेगळी सेवा करण्याची आवश्यकता नसते.” भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पूर्ण शरणागत झालेल्या भक्ताला लौकिक कर्मे करण्याची आवश्यकता नसते. भगवंताच्या शरणागत भक्ताला शुद्धीकरणाचे इतर कोणतेही कर्म करण्याची आवश्यकता नाही, कारण भक्तिमय सेवा सर्वथा शुद्ध आणि शक्तिशाली आहे.
ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्याने सर्व वृक्ष बहरतो आणि पोटाला पुरवलेले अन्न जसे शरीराच्या समस्त अंगाला पुष्ट आणि संतुष्ट करते त्याच प्रकारे पूर्ण पुऊषोत्तम भगवान श्रीकृष्ण अखिल सृष्टीचे उगम आहेत सर्व कांही त्यांच्यापासून उत्पन्न होते. म्हणून इतरांना संतुष्ट करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही.
-वृंदावनदास









