पहिले रेल्वेगेट येथील प्रकार : पुन्हा नव्याने पेव्हर्स बसविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथील पेव्हर्स निखळले आहेत. काँग्रेस रोडमार्गे टिळकवाडी येथे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रात्रीच्यावेळी निखळलेले पेव्हर्स दृष्टीस न पडल्याने अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने पेव्हर्स बसवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून टिळकवाडी येथील पहिले, दुसरे व तिसरे रेल्वेगेटची दुरुस्ती करण्यात आली. रेल्वेट्रॅकची संख्या वाढविल्यानंतर रेल्वेगेट परिसरात पेव्हर्स बसविण्यात आले. परंतु काही दिवसांतच हे पेव्हर्स निखळले. निखळलेले पेव्हर्स इतरत्र पडले असून दुचाकीचालकांचा यामुळे अपघात होत आहे.
काँग्रेस रोडमार्गे भरधाव वाहने पहिले रेल्वेगेट येथे जातात. परंतु काँक्रीट व पेव्हर्स निखळल्याने रस्ता खराब झाला असून, वाहने पुढे सरकण्यास विलंब लागतो. यामुळे वाहतूक कोंडीचा सामनाही वाहनचालकांना करावा लागत आहे. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने पुन्हा पेव्हर्स बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.









