कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार भव्य सोहळा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
18 व्या इंडियन प्रिमियर लीग आवृत्तीच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी थिरकणार असल्याचे आयपीएलच्या अधिकृत एक्स हँडलवर सांगितले आहे. हा भव्य रंगारंग सोहळा कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.
‘आयपीएलची 18 वर्षे पूर्ण होत असताना अपूर्व अशा चमकदार व भव्य सोहळ्याची आवश्यकता असते. आणि यासाठी दिशा पटानीपेक्षा सेन्सेशनल कोण असू शकेल? हा उत्साहवर्धक सोहळा अजिबात चुकवू नका’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दिशा पटानीसमवेत गायक करण औजला व श्रेया घोषाल हे देखील आपला कार्यक्रम सादर करणार आहेत. या सोहळ्याला आयसीसी अध्यक्ष जय शहा व अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
‘हा एक महत्त्वाचा सामना असल्याने तिकिटांची मागणी प्रचंड वाढली आहे. ईडन गार्डन्सवर दीर्घ कालावधीनंतर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,’ असे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली म्हणाले. मात्र इतर तपशील देण्याचे त्यांनी टाळले. आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून होणार असून आरसीबी व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्सवर उद्घाटनाचा सामना होणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, जिओ हॉटस्टारवरून केले जाणार आहे. केकेआर हा विद्यमान विजेता संघ असून मागील वर्षी त्यांनी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबादला हरवून जेतेपद पटकावले होते. यावेळी केकेआर संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे.









