7 वर्षांत करविल्या 70 शस्त्रक्रिया
माणसाच्या आयुष्यात कितीही आव्हाने उभी ठाकली तरी त्यांचा निर्धाराने सामना केल्यास तो जिंकू शकतो. याचे जिवंत उदाहरण आहे ब्रिटनमधील एक टिकटॉकर निकी लिली. निकीला अत्यंत विचित्र मेडिकल कंडिशन असून यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बिघडला आहे. तरीही ती स्वत:ला जगातील सर्वात सुंदर महिला मानते.
निकीला इन्स्टाग्रामवर 4 लाखाहून अधिक जण फॉलो करतात. तर टिकटॉकवर तिला 90 लाखाहून अधिक जण फॉलो करतात. निकी स्वत:च्या जीवनाशी निगडित व्हिडिओ आणि फोटोज शेअर करत असते. अनेकदा ती मॉडेलप्रमाणे छायाचित्रे काढून घेत लोकांचे लक्ष वेधून घेते. निकी स्वत:ला असलेल्या एका विचित्र मेडिकल कंडिशनसंबंधी सोशल मीडियावर व्यक्त होत असते.

निकीला आर्टिरिओवेनस मालफॉर्मेशन आहे. निकी 6 वर्षांची असल्यापासून तिच्या चेहऱ्यावर या वैद्यकीय स्थितीचा प्रभाव दिसून येऊ लागला. त्यापूर्वी ती सामान्य जीवन जगत होती, परंतु अचानक तिच्या डोळ्यांमधील आणि चेहऱ्यांवरील नसा दिसू लागल्या, तिचा चेहरा मोठ्या प्रमाणात सुजला, तिचे नाक आणि हिरड्यांमधून रक्त येऊ लागले. अनेक तपासण्या केल्यावर निकीला कॅनिओफेशियल आर्टिरिओवेनस मालफॉर्मेशन असल्याचे निदान झाले. मागील 7 वर्षांमध्ये तिच्यावर 70 शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि 350 हून अधिक वेळा तिने रुग्णालयाच्या फेऱ्या मारल्या आहेत.
सोशल मीडियावर मिळतो पाठिंबा
निकी स्वत:च्या आजारपणाविषयी काहीच लपवत नसल्याने लोक तिचे कौतुक करतात. तसेच निकी स्वत:च्या लुकमध्ये कृत्रिमपणा दर्शवित नाही. जीवनातील अनुभवांनी आव्हानांना कसे सामोरे जावे हे शिकविले असल्याचे निकी सांगते. सोशल मीडियाद्वारे ती लोकांदरम्यान स्वत:च्या मेडिकल कंडिशनसंबंधी जागरुकता निर्माण करण्याचे काम करत आहे.









