हवामान बदलाचा प्रभाव आता मानवी वयावर देखील पडत आहे. एक शतकापूर्वी लोक निरोगी जगत होते, परंतु आता ही स्थिती राहिलेली नाही. अमेरिकन नियतकालिक ‘ग्रिस्ट’नुसार हवामान बदल मानवाचे आयुष्य हिरावून घेत आहे. नॅचरल गॅसच्या उत्सर्जनामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढतेय. यामुळे जागतिक तापमानात वेगाने बदल घडून येत आहे. पृथ्वी अधिक उष्ण होत चालली असून आता प्राणी देखील आजारासाठी कारणीभूत ठरत आहेत.

माणसाने विकासाच्या नावावर वनतोड करत तेथे स्वत:चा वावर वाढविला आहे. यामुळे माणसांचा प्राणी, डास, बॅक्टेरिया, फंगसशी संपर्क वाढला आहे. दुसरीकडे हे सर्व जीवजंतू स्वत:ला बदलत्या हवामानाच्या स्थितीनुसार अनुकूल करत आहेत आणि या वातावरणात तग धरून आहेत. यामुळे अनेक आजार फैलावत असून ते मानवी जीवनासाठी धोकादायक आहेत.
आजारांशी थेट संपर्क वाढतोय
माणूस स्वत:च्या आयुष्यासाठी अनेक जीवांवर निर्भर असतो. अनेक जीवांना स्वत:चे भक्ष्य करून माणूस स्वत:चा उदरनिर्वाह देखील करत असतो. यामुळे माणूस या जीवांमध्ये आढळून येणारे बॅक्टेरिया किंवा त्यांच्यामुळे फैलावणाऱ्या आजारांच्या थेट संपर्कात येत आहे. तर वाढत्या तापमानचा दंश झेलणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय. दरवर्षी सुमारे 2 कोटी लोक हवामान बदलामुळे विस्थापित होतात. हे सर्व घटक आजार फैलावण्यासाठी उपयुक्त स्थिती निर्माण करत आहेत. पूर्वी संपुष्टात आलेले आणि नवे आजार दोघांचेही प्रमाण वाढत असल्याने मृत्यूदर वाढत आहे. अशा स्थितीत हवामान बदल मानवी आयुर्मानावरही प्रभाव टाकत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

तापमानवाढीमुळे मृत्यूंचा आकडा वाढणार
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हवामानात होणाऱ्या बदलांचा प्रभाव वेगाने मानवी आयुष्यावर होत आहे. 2030-50 पर्यंत केवळ मलेरिया किंवा दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे अडीच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड
ट्रॉपिकल मेडिसीनच्या वैज्ञानिकांनी स्वत:च्या अहवालात जगात उष्णतेमुळे होणाऱ्या एक तृतीयांश मृत्यूंसाठी मनुष्य जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.









