औषध फवारणी करून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
बेळगाव : खराब हवामानामुळे रब्बी हंगामात पेरणी केलेल्या मसूरवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. वडगाव, धामणे, येळ्ळूर शिवारातील मसूर पिकावर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हवामानाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून खरीप त्याचबरोबर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अतिवृष्टी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची रोग पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गतवर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली होती.
त्यानंतर आता रब्बी हंगामात पेरणी केलेल्या मसूरवरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मसूरला विमा सुरक्षा नाही. त्यामुळे पेरणी केलेली बियाणे तरी मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांतून उपस्थित केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यात जवारी मसूर, हिरवा वाटाणा आणि जवारी मोहरीला विमा कवचच नाही. इतर पिकांना विमा कवच दिला आहे. पण ती पिके बेळगाव परिसरात नाहीत. त्यामुळे बेळगाव परिसरात घेण्यात येणाऱ्या पिकांना विमा कवच द्यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, अशी मागणी केली जात आहे. गेल्या 15 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने याचा विपरीत परिणाम रब्बी पिकांवर होताना दिसत आहे.









