ब्राह्मोस खरेदीसाठी इच्छुक : विदेशमंत्र्यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत दौऱ्यावर आलेले फिलिपाईन्सचे विदेशमंत्री एनरिक मॅनालो यांनी गुरुवारी विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेत द्विपक्षीय चर्चा केली आहे. तत्पूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. मॅनालो यांच्या दौऱ्यात दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेवर चर्चा झाल्याचे समजते. भारतासोबत आम्ही मजबूत संरक्षण संबंध इच्छितो. अमेरिका आमचा पूर्वीपासूनच महत्त्वाचा सहकारी आहे तसेच दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार देखील असल्याचे मॅनालो यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी फिलिपाईन्सने भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चीन आमच्या सागरी भागात शिरकाव करत असून हा प्रकार आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करणारा आहे. आम्ही चीनला यासंबंधी स्पष्ट संदेश दिला आहे. हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रच नव्हे तर जगभरातील प्रत्येक सागरी क्षेत्र सर्वांसाठी मुक्त असावे अशी आमची इच्छा आहे. सागरी क्षेत्रातूनच व्यापार होतो आणि यावर कुठल्याही एकाचा देशाचा अधिकार असू शकत नसल्याचे मॅनालो यांनी म्हटले आहे.
दक्षिण चीन समुद्र अन् चीन
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या अरेरावीमुळे अनेक छोटे देश चिंतेत आहेत. यात तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेईचा समावेश आहे. भारत आणि अमेरिकेने या छोट्या देशांना साथ द्यावी, जेणेकरून चीनचा हस्तक्षेप मोडून काढता येईल यादृष्टीने फिलिपाईन्सने प्रयत्न चालविले आहेत. सागरी सुरक्षा, सायबर दहशतवाद, शिक्षण, आरोग्य आणि हवामान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आम्हाला मदत करू शकतो असे मॅनालो यांनी म्हटले आहे.
भारत-फिलिपाईन्सचे संबंध
2024 मध्ये भारत आणि फिलिपाईन्समधील राजनयिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण होतील. या संबंधांना मजबुती देण्यासाठी 2007 मध्ये दोन्ही देशांनी एक संयुक्त व्यासपीठ स्थापन करण्यात आले होते. या अंतर्गत पहिले सत्र 2011 मध्ये पार पडले होते. फिलिपाईन्सचे भौगोलिक स्थान भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रातील हा महत्त्वाचा देश आहे. भारत अन् फिलिपाईन्सच्या सैन्याने अनेकदा संयुक्त सैन्याभ्यास तसेच सागरी अभ्यास केले आहेत.









