चीनच्या मध्यस्थीनंतर पहिल्यांदाच प्रमुख नेत्यांची फोनवरुन चर्चा : पॅलेस्टाइन विरोधी युद्धगुन्हे रोखण्यावर सहमती
वृत्तसंस्था /रियाध
इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात चीनकडून महत्त्वपूर्ण तडजोड घडवून आणल्यावर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान राष्ट्रपती रईसी आणि सौदी युवराज यांच्यात पॅलेस्टाइन विरोधी युद्धगुन्हे रोखण्यावर सहमती झाल्याचे इराणकडून सांगण्यात आले. इस्रायल अन् हमास यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी सौदी अरेबिया शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. आम्ही याकरता सर्व क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटकांसोबत चर्चा करत आहोत. युद्धात सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जाऊ नये यावर भर देण्यात येत असल्याचे मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले आहे. हमास विरोधी युद्धात आम्ही इस्रायलसोबत आहोत. आम्ही याचबरोबर सौदी अरेबियाच्या नेत्यांसोबत सातत्याने संपर्कात आहोत असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने सलमान आणि रईसी यांच्यातील चर्चेनंतर सांगितले आहे.
पॅलेस्टिनींना हक्क मिळवून देण्याचा हेतू
इस्रायल-हमास युद्धादरम्यान काही देश इस्रायलसोबत तर काही जण पॅलेस्टिनींच्या बाजूने दिसून येत आहेत. सौदी अरेबिया पॅलेस्टिनींसोबत उभा आहे. पॅलेस्टिनी लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देणे हा आमचा हेतू आहे. पॅलेस्टिनींना देखील एक चांगले जीवन आणि शांततेचा हक्क असल्याचे सलमान यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. दुसरीकडे इराणने युद्धाच्या प्रारंभापासून हमासच्या हल्ल्यांचे समर्थन पेले आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना नुकसान पोहोचले आहे. या धक्क्यातून सावरणे इस्रायलला सोपे ठरणार नाही. इस्रायलमध्ये जे काही घडत आहे त्याकरता तो स्वत:च जबाबदार असल्याचे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी 10 ऑक्टोबर रोजी म्हटले होते.
चीनच्या मध्यस्थीने शत्रुत्व दूर
यापूर्वी जून महिन्यात 7 वर्षांनी इराणने सौदी अरेबियातील स्वत:चा दूतावास पुन्हा सुरू केला होता. मार्च महिन्यात दोन्ही देशांनी दूतावास सुरू करण्यासंबंधी करार केला होता. याच्या अंतर्गत 2016 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देश परस्परांच्या भूमीवर स्वत:चे दूतावास सुरू करण्यास तयार झाले होते. इराणचे विदेशमंत्री हुसैन आमिर अब्दुल्लाह यांनी लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये याची माहिती दिली होती. दोन्ही देशांदरम्यान हा करार चीनने घडवून आणला होता.
हमासला इराणकडून पाठबळ
इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी इस्रायलवरील हल्ल्याचे प्लॅनिंग करण्यास हमासला मदत केली होती, असा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी बैरूत येथे झालेल्या एका बैठकीत हल्ल्यासाठी इराणकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी ऑगस्टपासून हमाससोबत मिळून इस्रायलवर जमीन, आकाश अन् समुद्रमार्गे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याचे प्लॅनिंग करत होते, असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये लोकांनी जल्लोष केला होता. तर हमासच्या हल्ल्यात आमची कुठलीच भूमिका नसल्याचा दावा इराणने केला आहे.









