जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांचा पुढाकार : सरकारी नियमानुसार पुनर्वसन करण्याचे आश्वासन
बेळगाव : भीमगड अभयारण्य क्षेत्रातील तळेवाडी (ता. खानापूर) या गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासंबंधी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. भीमगड नेचर कॅम्पच्या आवारात ही बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, अभयारण्यातून स्थलांतर करू इच्छिणाऱ्या नागरिकांची सरकारी नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार आहे. अभयारण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी रस्ते, पिण्याचे पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा पुरविणे शक्य होत नाही. त्यामुळे तळेवाडी ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी होकार दर्शविल्यास त्वरित त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, डीसीएफ मरिया क्रिस्तोराजा, एसीएफ सुनिता निंबरगी, खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह महसूल, पोलीस व वनखात्याचे अधिकारी यांनी शनिवारी तळेवाडी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना गावकऱ्यांनी पर्यायी जागा व घरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर शासकीय नियमानुसार व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गावकऱ्यांजवळील कागदपत्रे पडताळून पुनर्वसनासाठी सरकारकडून मंजूर झालेल्या अनुदानाचा वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी व पुनर्वसन समितीच्या सदस्य सचिवांच्या नावे संयुक्त खाते उघडण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केली.









