विविध 24 खात्यांच्या अधिकाऱ्यांपैकी केवळ सात अधिकारी हजर : ग्रामस्थांची उपस्थितीही अत्यल्प : नगरपंचायत दर्जा मिळाल्याने ग्रामसभा ठरली शेवटची
वार्ताहर/हिंडलगा
येथील ग्रामपंचायतीची शेवटची ग्रामसभा गुरुवार दि. 21 रोजी समर्थनगर येथील बाबू जगजीवनराम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी अरण्य अधिकारी गिरीश इटगी उपस्थित होते. ग्रामसभेला ग्रा. पं. अध्यक्षा मीनाक्षी हित्तलमणी, उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सर्व सदस्य-सदस्या, विविध खात्याचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रथम ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत कांबळे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. या सभागृहात आसन व्यवस्था व इतर सुविधा उत्तम असल्या तरी ध्वनिक्षेपक व्यवस्था उत्तम नसल्याने उपस्थित नागरिकांनी जागा बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे थोडावेळ गोंधळ माजला. लागलीच याची नोंद पंचायत विकास अधिकारी स्मिता चंदरगी यांनी घेतली व त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या दत्त मंदिराच्या सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
प्रथम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांनी आरोग्य योजनेबाबत विविध उपयुक्त माहिती देऊन भारत देश टी. बी.चे निर्मूलन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु जो टी.बी. रुग्ण आहे तो समोर येत नाही, याची खंत व्यक्त करून नागीरकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक याविषयी बी.पी.एल., ए.पी.एल. कार्डधारकांना मिळणाऱ्या सवलतीची माहिती देऊन शासनामार्फत मिळणाऱ्या फंडाचे विवरण केले.
सोलर योजनेविषयी माहिती
हेस्कॉमचे अधिकारी व सोलार याबाबत राहुल सूर्यवंशी यांनी सबसिडी तसेच एक किलो वॅट, दोन किलो वॅट व तीन किलो ते दहा किलो वॅट यासाठी येणारा खर्च व कर्ज योजना याबाबत उपयुक्त माहिती देऊन सोलरविषयी जागृती करून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनेची माहिती दिली. डॉ. अमृता हिरेमठ यांनी तंबाखू व गुटखा खाण्यापासून होणाऱ्या रोगांविषयी माहिती दिली. कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक विनायक देशपांडे यांनी बँकेच्या विविध ठेव योजना व कर्ज योजनांविषयी माहिती दिली. कृषी अधिकारी व या परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
संगणक उतारा-भ्रष्टाचार दूर करण्याची मागणी
नागरिकांच्या वतीने विविध प्रकारच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. तसेच त्याचे निवारण करण्यासाठी विनंती केली. यामध्ये प्रामुख्याने संगणक उतारा व होणारा भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावेत, अशा प्रकारच्या सूचना केल्या. यावेळी लक्ष्मण कडोलकर, गजानन काकतकर, राजू जाधव, प्रवीण देवगेकर, वीणा पाटील, मनोज हित्तलमणी, अमोल कडोलकर, निवृत्त जवान शिवराय रुद्रगौडर व बऱ्याच महिलांनी आपल्या गल्लीतील रस्ते, गटारी, सांडपाण्याच्या बाबतीत उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.
अतिक्रमणे दूर करणार
कार्यक्षेत्रात झालेल्या अतिक्रमणाबाबत लवकरात लवकर कारवाई करून अतिक्रमणे दूर करण्याबाबत सर्वांनीच या बाबीला अग्रक्रम देऊन सूचना केल्या. याबाबत पंचायत विकास अधिकारी स्मिता चंदरगी यांनी सर्व भागाची पाहणी करून लवकरच अतिक्रमणे दूर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सभामंडपासाठी जागा मंजूर करण्याची मागणी
येथील श्री महालक्ष्मीदेवी यात्रोत्सव संघाच्या व गावच्यावतीने संघाचे मार्गदर्शक रमाकांत पावशे यांनी ग्रा.पं. अध्यक्षांना निवेदन दिले. गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसोहळा, सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी मंगल कार्यालय किंवा सभामंडपासाठी रेशीम खात्याच्या बाजूला असलेली जागा यात्रोत्सव संघाला मंजूर करावी, जेणेकरून यात्रोत्सवातील रक्कम खर्च करून त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी उपयुक्त असे सभागृह किंवा मंगल कार्यालय बांधले जाईल. तरी सर्व ग्रामपंचायत कमिटीनी सहकार्य करावे, अशी विनंती केली. या निवेदनाचा नोडल अधिकारी व ग्रामपंचायत अध्यक्षांनी स्वीकार केला.
ग्रामसभा गावात घेण्याची मागणी
यापुढील ग्रामसभा गावात घेण्यासंदर्भात सर्वांनी सूचना केल्या. ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांनी देखील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. शेवटी संतोष नाईक यांनी आभार मानले. या चर्चेत रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, मिथुन उसुलकर, डी. बी. पाटील, स्नेहल कोलेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. ग्रामसभेला लोकांची उपस्थिती कमी होती. या ठिकाणी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. विविध खात्याच्या 24 अधिकाऱ्यांपैकी फक्त सात खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली. नुकताच कर्नाटक राज्य सरकारने हिंडलगा ग्रामपंचायतचा दर्जा नगरपंचायतमध्ये करण्यात आल्याने ही ग्रामसभा शेवटचीच ठरली आहे.









