खासदार शेट्टर यांनी घेतली महाप्रबंधकांची भेट
बेळगाव : सुळेभावी (ता. बेळगाव) येथील शेतकऱ्यांना संपर्क रस्त्याची सोय करून देण्याबाबत वरिष्ठ अभियंत्यांकडून अहवाल मिळवून कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन नैर्त्रुत्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी खासदार जगदीश शेट्टर यांना दिले. खासदार शेट्टर यांनी मंगळवारी हुबळी येथे नैर्त्रुत्य रेल्वे महाप्रबंधकांची भेट घेऊन बेळगाव लोकसभा मतदारसंघात रेल्वे विभागाकडून अपेक्षित असलेल्या कामांची माहिती दिली. सुळेभावी येथील एल.सी.नं. 79 ए नजीक नव्याने उभारण्यात येत असलेला रेल्वे भुयारी मार्ग हा अशास्त्रीय असून यामुळे शेतकऱ्यांना शेतवडीकडे जाण्यास समस्या येत आहे. शेतकऱ्यांना अनुकूल होण्याच्यादृष्टीने संपर्क रस्ता करून देण्याची मागणी केली.
घटप्रभा रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे विभागाची जमीन बळकावण्यात आल्याचे सांगत तेथील घरमालक, व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. तेथील घरमालक, व्यावसायिकांकडे कागदोपत्री पुरावे आहेत. रेल्वे विभागाने याची पाहणी करून न्याय द्यावा. लोकापूर-रामदुर्ग-सौंदत्ती-धारवाड या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्यात यावे. या मागण्यांना रेल्वेच्या महाप्रबंधकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. बेळगाव-कित्तूर-धारवाड मार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होताच निविदा मागवून कामाला सुऊवात करण्यात येणार असल्याचे महाप्रबंधकांनी सांगितले. बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार, बेळगावात नव्याने बांधण्यात येणारा रेल्वे उड्डाणपूल, बेळगाव-मनुगरु रेल्वे पूर्ववत करणे, बेळगाव-मिरज- बेळगाव रेल्वेचे मेमो रेल्वेमध्ये परावर्तन करणे यावरही शेट्टर यांनी महाप्रबंधकांशी चर्चा केली.









