पणजी : राष्ट्पती द्रोपदी मुर्मू यांनी बदलत्या भारताचे स्वप्न आणि 2047 या सालापर्यंत भारत देश कसा असू शकतो याविषयक विस्तृत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची जी माहिती संसदेत आपल्या भाषणातून दिली ती समस्त भारतीयांपर्यंत पोहचावी या उद्देशाने भाजप पक्षातर्फे 5 मार्च ते 20 मार्च या दरम्यान राज्यात ‘शक्ती केंद्र’ या बॅनरखाली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा राज्याचे भाजपचे राज्य समन्वयक प्रेमानंद म्हांबरे यांनी दिली.
गोवा भाजप प्रदेशच्या कार्यालयात आज (शुक्रवारी) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राज्य सचिव गोरख मांद्रेकर, पक्षाच्या सोशल मिडियाचे प्रमुख वल्लभ धाकणकर उपस्थित होते. म्हांबरे यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपने गेल्या आठ वर्षांत सर्व जनतेचा सर्वांगीण विकास केल आहे. यामध्ये कोणताही भेदभाव केला नसल्याने सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना गरीबापर्यंत पोहचल्या. या सर्व योजना आणि त्यांची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वांना व्हावी यासाठी राष्ट्रपतींच्या या अभिषणावर चर्चा करण्याचा पक्षाने निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी राज्यातील बूथ कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दक्षिण व उत्तर गोवा समित्यांमार्फत हा कार्यक्रम पार पाडला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्पती मुर्मू यांनी संसदेत 24 पानांचे अभिभाषण सादर करताना 84 मार्गदर्शक मुद्दे सांगितल्याचे म्हांबरे यांनी सांगितले.









