पुणे / प्रतिनिधी :
डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी केलेल्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये देशातील ब्राह्मोस, अग्नी 6 सह विविध क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या प्रकरणात प्रदीप कुरुलकर यांना 3 मे रोजी एटीएसकडून अटक करण्यात आली होती. यासंदर्भात एटीएसने पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राला सदर व्हॉट्सॲप चॅटही जोडण्यात आले आहे. पाकिस्तानमधील आयएसआयशी संबंधित या महिला गुप्तहेराने हनी ट्रपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांना आपले नाव झारा दासगुप्ता असे सांगितले होते. या दोघांमध्ये 10 जून 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 या काळात कितीतरी वेळा व्हॉट्सॲप चॅट झाल्याची बाब त्यांच्या मोबाईलच्या तपासणीतून उघड झाली आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात कुरुलकर व झारामध्ये झालेल्या व्हॉट्स अप चॅटचाही सविस्तर उल्लेख केला आहे.
19 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2022 या काळात या दोघांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राबाबत अनेकदा चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात सर्वांत विध्वंसक ब्राह्मोससुद्धा तूच बनवले आहेस का बेब, असा प्रश्न झाराने विचारला असता कुरुलकर यांनी माझ्याकडे ब्राह्मोसच्या सर्व प्रकारांचे 186 पानांचे सुरुवातीचे रिपोर्ट्स आहेत. मी त्यांची कॉपी व्हॉट्सॲपवर पाठवू शकत नाही. कारण ते गोपनीय आहेत. पण मी ते टेस करून तयार ठेवतो. तू येथे आलीस, की मी ते तुला दाखवेन, असे झाराला सांगितल्याचे चॅट्समध्ये दिसत आहे.
अग्नी 6 सह ड्रोन प्रोजेक्टविषयीही चर्चा
ब्राह्मोसव्यतिरिक्त कुरुलकर आणि झाराने अग्नी 6, रुस्तम, सॅम, यूसीएव्ही आणि डीआरडीओच्या इतर ड्रोन प्रोजेक्ट्सविषयीही चर्चा केली. क्वाडकॉप्टर, डीआरडीओ ड्युटी चार्च, मीटिऑर मिसाईल, राफेल, आकाश आणि अस्त्र मिसाईलबाबतही कुरुलकरांनी झाराशी चॅटिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच डीआरडीओला लागणारे साहित्य पुरवणाऱ्या व भारतीय लष्कराला रोबोटिक उपकरणे पुरवणाऱ्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचाही उल्लेख कुरुलकर यांनी झाराशी केलेल्या चॅट्समध्ये आहे.
थोडा धीरज रखो…
अग्नी 6 वर कुरुलकर व्हॉट्सॲपवर चर्चा करताना या क्षेपणास्त्राच्या लाँचरचे डिझाईन मी तयार केले आहे. ते प्रचंड यशस्वी झाले आहे, असे कुरुलकर यांनी झाराला सांगितले होते. त्यावर अग्नी 6 हे कधी लाँच केले जाईल? असा प्रश्न झाराने विचारला असता ‘नाईट फायर करेंगे. थोडा धीरज रखो,’ असे कुरुलकर यांनी तिला सांगितल्याचे व्हॉट्सॲप चॅटवरून दिसत आहे.
झाराचा नंबर हॅप्पी मॉर्निंग नावाने सेव्ह
एटीएसने सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेराचा नंबर एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये झारा दासगुप्ता या नावाने सेव्ह न करता ‘हॅप्पी मॉर्निंग’ या नावाने सेव्ह केला होता. त्यांनी झाराला डीआरडीओच्या दोन शास्त्रज्ञांचीही नावेही कळविली, असेही समोर आले आहे.








