मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
हिवाळी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. 19 जानेवारी रोजी पूर्ण दिवस म्हादई विषयावर चर्चा करण्यात येणार असून तसा ठराव सरकारतर्फे मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामकाज सल्लागार मंडळाच्या (बीएसी) बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यांनी सांगितले की, अधिवेशन 4 दिवसांचे असून ते आणखी वाढवणे शक्य नाही. त्यामुळे म्हादईवरील चर्चेसाठी गुरुवारी विचार-विनिमय करायला हरकत नाही. विरोधी पक्षीय आमदारांची देखील म्हादईवर चर्चेची मागणी असून ती पूर्ण व्हावी म्हणून गुरुवारी चर्चा करण्याचा प्रस्ताव सरकारने आखला असून कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीतही त्यावर एकमत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, कळसा – भांडुरा प्रकल्पामार्गे म्हादईचे पाणी वळवले असेल तर ते पुन्हा गोवा राज्याकडे – म्हादईच्या पात्रात वळवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. म्हादईकरीता सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. गोव्याचे हित सर्वोच्च असून ते कायम राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. वन्यजीवन संवर्धन कायद्यानुसार राज्य सरकारने कर्नाटकला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे ठरविले होते. म्हादई पाणी तंटा आणि म्हादईचे पाणी वळवले म्हणून कर्नाटक सरकारला त्या कायद्यान्वये नोटीस देण्यात आल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
अधिवेशन एका दिवसाने वाढविण्याची मागणी फेटाळली
दरम्यान, विधानसभा अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवून शुक्रवारी 20 जानेवारी रोजी म्हादई विषयावर खास चर्चा ठेवावी अशी मागणी कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीतून विरोधकांनी केली परंतु ती फेटाळून लावण्यात आल्याची माहिती आपचे आमदार व्हॅन्सी व्हिएगश यांनी दिली. विरोधकांच्या मागणीला किंमत नाही. आधीच अधिवेशन ईन-बिन चार दिवसांचे! त्यात पहिला दिवस राज्यपालांच्या भाषणात गेला आणि चौथा दिवस म्हादईवर गेला तर फक्त दोनच दिवसांचे अधिवेशन होते, अशी टीका व्हिएगश यांनी केली. 19 जानेवारीचा कामकाजाचा दिवसही त्यामुळे वाया जाणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 दिवसांचे घेणार : मुख्य़मंत्री
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 दिवसांचे घेण्यात येणार असून त्यात विविध विषयांवर विस्ताराने चर्चा करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आरजीचे आमदार विरेश बोरकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी शुक्रवारी 20 जानेवारी रोजी पूर्ण दिवस विधानसभेत म्हादईवर चर्चा करण्याची मागणी केली होती. ती फेटाळण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
आजी-माजी आमदार, खासदारांची 20 रोजी बैठक
विधीमंडळ फोरमतर्फे आजी-माजी आमदार – खासदारांची एक बैठक शुक्रवार 20 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वा. विधानसभा संकुलात पीएसी हॉलमध्ये बोलवण्यात आली असून त्यात म्हादईच्या विषयावर खुली चर्चा करण्याचे ठरवण्यात आले आहे. सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रत्येक आजी-माजी आमदारांनी तसेच खासदारांनी त्या बैठकीत म्हादईबाबत आपापले मत मांडावे. खुलेपणाने बोलावे, सूचना कराव्यात. त्यातून विधीमंडळ फोरमच्यावतीने म्हादईप्रकरणी पुढे काय करायचे हे ठरवले जाणार आहे. त्यामुळे 19 जानेवारीला विधानसभेत तर 20 जानेवारीला पीएसी हॉलमध्ये म्हादईवर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









