आमदार कौजलगी यांनी घेतली वनमंत्र्यांची भेट
प्रतिनिधी / बेंगळूर
बेळगाव जिल्ह्यातील पुण्यभूमी श्री क्षेत्र सोगल सोमनाथ देवस्थानाजवळ असलेल्या लघु प्राणीसंग्रहालयाच्या ठिकाणी पक्षीधाम उभारण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, अशी ग्वाही अरण्य, वन्यजीवी, पर्यावरण खात्याचे मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली आहे. गुरुवारी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने बेंगळूर येथील निवासस्थानी मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार मृगवन बंद करावे लागणार आहे. याच मृगवनाचे पुनरुज्जीवन किंवा त्या जाग्यावर पक्षीधाम उभारण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील. जेणेकरून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पक्षीधामचेही आकर्षण राहील, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी राजीव रंजन, अप्पर मुख्य वनसंरक्षणाधिकारी व वनविभागाचे मुख्य सचिव संजय बिज्जूर, वन्यजीवी विभागाचे कुमार पुष्कर, पर्यावरण विभागाचे विजय मोहनराज, बेळगाव विभागाचे मंजुनाथ चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.









