दोन दिवस होणार घमासान : भाजपकडून सदस्यांना व्हीप जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत 16-17 डिसेंबर रोजी संविधानावर चर्चा होणार आहे. या चर्चेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या सर्व राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी करत दोन्ही दिवस भारतीय संविधानावरील नियोजित चर्चेदरम्यान वरिष्ठ सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी आणि शनिवारी लोकसभेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेत राज्यघटनेसंबंधी परखड मतप्रदर्शन केले. काँग्रेसच्यावतीने प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी आपली मते मांडली. तर, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राजनाथ सिंह, अनुराग ठाकूर, रविशंकर यांनीही प्रभावीपणे बाजू मांडली. लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दणकेबाज भाषणाने या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला होता. आता पुढील दोन दिवस राज्यसभेत संविधानावरून शाब्दिक संघर्ष पहावयास मिळणार आहे.
भाजपकडून सदस्यांसाठी निवेदन
भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, 16 डिसेंबर आणि मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी राज्यसभेत विशेष चर्चा होणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहणे अगत्याचे असल्याचे भाजपच्या अधिकृत निवेदनात जाहीर करण्यात आले आहे. या चर्चेअंती सर्व सदस्यांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
विशेष चर्चेचा उद्देश काय?
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर होणाऱ्या विशेष चर्चेचा उद्देश राज्यघटनेचे महत्त्व, त्याची मूलभूत तत्त्वे आणि 75 वर्षांतील योगदान याविषयी चर्चा करणे हा आहे. सरकार या संधीचा वापर करून संविधानाप्रती आपली निष्ठा आणि लोकशाही मूल्यांना बळकट करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे.









