एक हजार वर्षे जुन्या कथित एलियनचे मृतदेह केले सादर : पेरूच्या खाणीत अवशेष मिळाल्याचा केला दावा
वृत्तसंस्था /मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सच्या (परग्रहवासीय) अस्तित्वाबद्दल चर्चा झाली असून यादरम्यान 2 मृतदेहही दाखविण्यात आले आहेत. हे मृतदेह एलियन्सचा असल्याचा दावा करण्यात आला. हे मृतदेह पेरूमधील एका खाणीत मिळाले होते, जे सुमारे 1 हजार वर्षे जुने असल्याचा दावा मेक्सिकन पत्रकार आणि यूफोलॉजिस्ट जेम मोसान यांनी केला आहे. संसदेत या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. ममी ठरलेल्या एलियन्सच्या मृतदेहांना लाकडी बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते आणि याचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. यावेळी अमेरिकेच्या नौदलाचे माजी वैमानिक रायन ग्रेव्स देखील हजर होते. ग्रेव्स यांनीच अमेरिकेच्या संसदेत एलियन्सचे स्पेसक्राफ्ट पाहिल्याचा दावा केला होता. मेक्सिकन संसदेत या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान हार्वर्ड एस्ट्रॉनॉमी विभागाच्या प्राध्यापकाने सरकारकडे एलियन्सवर अध्ययन करण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
युएफओ सॅम्पल्सवर अलिकडेच ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमध्ये अध्ययन झाले होते. तेथे वैज्ञानिकांनी डीएनएचे रेडिओकार्बन डेटिंगद्वारे विश्लेषण केल्याची माहिती पत्रकार मोसान यांनी दिली. यापूर्वी जुलैमध्ये अमेरिकेच्या संसदेत देखील एलियन्सवरून चर्चा झाली होती. यादरम्यान अमेरिकेच्या नौदलाचे माजी गुप्तचर अधिकारी निवृत्त मेजर डेव्हिड ग्रश यांनी अमेरिका अनेक वर्षांपासून युएफओ आणि एलियन्सशी निगडित माहिती लपवत असल्याचा दावा केला होता. अमेरिका या युएफओंच्या रिव्हर्स इंजिनियरिंगवर काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले हेते.
1930 मध्ये मिळाले एलियनचे शव
मेजर ग्रश 2022 च्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या डिफेन्स एजेन्सीसाठी युएपी (युएफओशी निगडित संशयास्पद घटना) वर विश्लेषण करत होते. सरकारला एलियन्स दिसून आले होते, असा दावा ग्रश यांनी केला होता. कामादरम्यान अनेक वर्षांपासून क्रॅश झालेल्या युएफओवर सुरु असलेले संशोधन अन् रिव्हर्स इंजिनियरिंग प्रोग्रामविषयी कळल्याचे ग्रश यांनी म्हटले होते. तर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हे दावे फेटाळले होते. अमेरिकेने एलियनशी निगडित कुठलाच कार्यक्रम राबविला नसल्याचे पेंटागॉनकडून सांगण्यात आले.
युएफओसंबंधी टास्क फोर्स
2020 मध्ये युएफओच्या चौकशीसाठी तयार करण्यात आलेल्या अमेरिकन टास्क फोर्सने एक अहवाल जारी केला होता. 9 पानांच्या या अहवालात अमेरिकन गव्हर्नमेंट सोर्सद्वारे 2004-2021 दरम्यान 144 युएफओविषयी माहिती देण्यात आली होती. पेंटागॉन त्यांना अनयाडेंटिफाइड एरियल फिनॉमिना म्हणजेच युएपी म्हणते. अहवालात युएफओ दिसल्याची पुष्टी करण्यात आली नाही तसेच ही बाब फेटाळण्यात आली नाही. अशाप्रकारचे ऑब्जेक्ट पृथ्वीवर एलियन्स येण्याचा संकेत असू शकतात, असे नमूद करण्यात आले.
वैज्ञानिकांनी फेटाळला दावा
मेक्सिकोच्या संसदेत दाखविण्यात आलेल्या एलियनच्या कथित मृतदेहाला फसवणूक असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. दाखविण्यात आलेले मृतदेह खरे असल्याबद्दल संशय असून ते एलियन्सचे अवशेष नाहीत. प्रत्यक्षात एलियन्सव्चा भास करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे संशोधक ज्युलियट फिएरो यांनी म्हटले आहे.









