नितीश, स्टॅलिन अन् अखिलेश गैरहजर :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या आघाडीची बुधवारी बैठक झाली आहे. या बैठकीसाठी खर्गे यांनी 28 पक्षांना आमंत्रित केले होते. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सप अध्यक्ष अखिलेश यादव या बैठकीत सामील झाले नाहीत.
बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी आणि आप नेते राघव चड्ढा समवेत अनेक नेत्यांनी भाग घेतला. सपच्या वतीने रामगोपाल यादव हे बैठकीत सामील झाले.
‘इंडिया’च्या बैठकीची वेळ काँग्रेसच्या सोयीनुसार का निर्धारित होते? या बैठकीविषयी मला पूर्वी सांगण्यात आले नव्हते. आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत असे 4 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांनी सांगितले होते. बैठकीसंबंधी किमान 7-10 दिवस अगोदर कल्पना दिली जावी असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक 16-18 डिसेंबरदरम्यान होणार असून यात आघाडीच्या नेतृत्वासंबंधी निर्णय घेतला जाणार असल्याचे शिवसेना (युबीटी) गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
अलिकडेच 5 राज्यांची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. यातील 4 राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. निवडणुकीदरम्यान आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक्युद्ध पेटले होते. मध्यप्रदेशात समाजवादी पक्षाकरता जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिला होता.









