पक्षीय संघटनेतील बदलांबाबत हालचाली गतिमान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात बुधवारी तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत भाजपचे संभाव्य नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेश राज्यातील कामगिरीबाबत विशेष चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ पातळीवर लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा आढावा सुरू केला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुमारे तासभर भेट घेतली. या बैठकीत पराभवावर चर्चा झाली. त्यानंतर काही वेळातच अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचल्यानंतर दोघांमध्ये जवळपास दोन तास बैठक सुरू होती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे निराश झालेल्या भारतीय जनता पक्षाने खराब कामगिरीचा आढावा घेण्यास सुऊवात केली आहे. त्यातच आता नवीन पक्षाध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रियाही सुरू होणार असल्याने पक्षात संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. या बदलांच्या अनुषंगाने बैठकांचे सत्र वाढले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निकालांचा आढावा घेण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल प्रतिक्रिया घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील नेत्यांची बैठक घेतली जात आहे. एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांची भेट घेत अभिप्राय घेतला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा आणि प्रशासनाकडून पक्षाविरोधात केलेली कामे हे पक्षाच्या निवडणुकीतील खराब कामगिरीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच भाजपने आपल्या आढावा अहवालात या पराभवासाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.









