वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेत जी-20 संघटनेची परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या देशात गेलेले भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी एकमेकांशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांची ही चर्चा साधारणत: अर्धा तास चालली होती.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमा कराराचे क्रियान्वयन, हिंदूंचे पवित्र स्थळ असलेल्या हिमालयातील मानसरोवराच्या यात्रेचा पुनरारंभ आणि इतर द्विपक्षीय संबंधांविषयी या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कराराचे क्रियान्वयन सुरळीत
भारत आणि चीन यांच्यात सलग तीन वर्षे चाललेला सीमासंघर्ष संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी करार झाला होता. दोन्ही देशांच्या सेनांनी आपल्या संघर्षपूर्व स्थितीत परत जावे, असे या कराराच्या अंतर्गत ठरविण्यात आले होते. या कराराचे क्रियान्वयन आतापर्यंत सुरळीत झाले आहे. संघर्षबिंदूंवरुन दोन्ही देशांच्या सेना संघर्षपूर्व स्थितीपर्यंत मागे हटण्याची प्रक्रिया केली गेली आहे. तसेच दोन्ही सेनांमधल्या मानवरहीत सीमाप्रदेशात गस्त घालण्याचे कामही पूर्वीच्याच भागांमध्ये करण्यात येत आहे. जयशंकर आणि वांग यी यांच्या भेटीत या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.
द्विपक्षीय व्यापारासंदर्भातही चर्चा ?
दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि चीन यांच्या परस्पर व्यापारी संबंधांवरही चर्चा झाली असे अनधिकृत वृत्त आहे. तथापि, या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सध्या दोन्ही देशांच्या परस्पर व्यापाराचा समतोल चीनच्या बाजूने आहे. याचा अर्थ असा, की चीन भारताकडून जितकी आयात करतो. त्यापेक्षा जवळपास पाचपट आयात भारत चीनकडून करत असतो. त्यामुळे भारताची या व्यापारातील तूट बरीच मोठी आहे. ती कमी करण्याच्या प्रयत्नात भारत आहे.









