लोकसभा निवडणुकीपूर्वी सहमतीचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ चेन्नई
लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांमध्येच होणार आहे. याचदरम्यान तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय आघाडी समितीचे संयोजक मुकुल वासनिक यांनी तामिळनाडूतील नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे.
तर सलमान खुर्शीद, अजॉय कुमार (तामिळनाडू आणि पंड्डुचेरीचे अखिल भारतीय काँग्रेस समिती प्रभारी) समवेत अन्य वरिष्ठ नेत्यांनी रविवारी चेन्नईच्या अन्ना अरिवलयम येथे द्रमुक जागावाटप समितीसोबत चर्चा केली आहे.
2019 च्या निवडणुकीत ठरलेल्या आकड्यानुसारच काँग्रेसला यावेळीही जागा मिळण्याचा अनुमान आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तामिळनाडूत 10 जागा लढविल्या होत्या आणि यातील 9 जागांवर विजय मिळविला होता. द्रमुकने 20 जागा लढवून सर्व जागांवर विजय मिळविला होता. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने राज्यातील 39 पैकी 38 जागा मिळवत स्वत:चे वर्चस्व दाखवून दिले होते.
इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेना (युबीटी), तृणमूल काँग्रेसने स्वत:च्या राज्यांमध्ये अधिक जागांची मागणी केल्याने काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशातील जागावाटपासाठी काँग्रेससोबत चर्चेत विजयी उमेदवाराच्या निकषावर जोर दिला आहे. तसेच भविष्यात चर्चेद्वारे जागावाटपावर सहमती होईल असा विश्वास सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी क्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात सप आणि रालोद यांच्यातील आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे.