लहान मुले निरागस असतात म्हणजे ती मुले कोणाच्या बाबतीत कायमचे शत्रुत्व मनात ठेवत नाहीत, कोणाशी मैत्री करायची/करायची नाही असा भेदभाव करत नाहीत. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ’ असे तुकाराम महाराज म्हणतात. ज्याचा अर्थ ‘माणसा माणसामध्ये भेद करणे ही अमंगळ बाब आहे. लहान मुले भेदाभेद करायला कुठे शिकतात? त्याचे शिक्षण मिळण्यास घरापासून सुरुवात होते. आई स्वयंपाक करते, बाबा चहा प्यायल्यावर चहाचा कप तिथेच ठेवतात आणि तो आई उचलून ठेवते. बाबांचे मित्र घरी आल्यावर त्यांना चहा-पाण्याची व्यवस्था आईला करावी लागते पण आईच्या मैत्रिणी घरी आल्यावर त्यांच्या चहा-नाश्त्याची व्यवस्था बाबांना करावी लागत नाही. आई-बाबा दोघेही नोकरी करतात पण बाबांचा डबा आईलाच भरून द्यावा लागतो. घरामध्ये कोणीही आल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्याचा ग्लास देण्याचे काम मुलीला करावे लागते. घरातील महत्त्वाचे अंतिम निर्णय घेण्यासाठी बाबा हे ‘फायनल ऑथोरिटी’ असतात.

बाबा आणि आजोबा कधी ‘सॉरी’ म्हणत नाहीत, अशी अनेक दृश्ये बघता बघता मुले लहानाची मोठी होतात आणि भेदभाव कसा करायचा असतो याचे शिक्षण घरीच मिळते. ‘मुलींसारखा का रडतो आहेस?’, ‘माझ्याबरोबर येणार आहेस की आईबरोबर जाऊन बायकांच्यात बसणार आहेस?’ अशी वाक्ये मुलांच्या मनावर दीर्घकाळ विपरीत परिणाम करणारी असतात. अशी वाक्ये ऐकता ऐकता महाविद्यालयात गेल्यावर/कमावते झाल्यानंतर विचार करू लागल्यास त्यातला फोलपणा मुलांना कळतो आणि त्यांचा पालकांविषयी आदर कमी होतो. मुलीने बाहुलीबरोबर खेळायचे असते आणि मुलाने ‘कार’ बरोबर खेळायचे असते, ‘गोड दिसणारी बाहुली’ गोरी असते, ‘बारीक व्हा’, ‘उंच व्हा’, ‘हुशार व्हा’ अशा सूचना जाहिराती-समाज माध्यमे यामधून मिळत असतात. त्यांचा मारा एवढा असतो की ‘फेअर अँड लव्हली’ मध्ये ‘अनफेअर’ काय आहे हे समजण्यासाठी आणि मुला-मुलीना समजावण्यासाठी पालकांना विशेष प्रयत्न करावे लागतात.
मित्रांची निवड
‘कोणाबरोबर खेळायला गेला होतास?, त्याच्यापेक्षा चांगला मित्र मिळाला नाही का तुला?’, ‘आपल्या सोसायटीच्या बाहेरच्या मुलांबरोबर खेळू नकोस’, ‘आपल्या लोकांच्यात असा स्वयंपाक करत नाहीत’, ‘त्यांच्यात आपल्यासारखी स्वच्छता नसते’, अशी वाक्ये ऐकल्यावर लहान मुलांना प्रश्न पडतो की मित्र-मैत्रिणी कोण असावे, कोणत्या समाजातले असावे, त्यांचा आर्थिक स्तर काय असावा याबद्दल नियमावली पालक का ठरवतात? फक्त हुशार मुला-मुलींबरोबर मैत्री करण्यात अर्थ नसतो. वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या आवडी निवडी असलेले मित्र-मैत्रिणी असलेल्या मुलांचे आयुष्य समृद्ध होत असते. शाकाहारी पालक मांसाहाराबद्दल आणि तसा आहार घेणाऱ्या लोकांबद्दल अनेक शेरे मारतात. त्यामुळे ते अन्न खाणे गैर आहे अशी धारणा शालेय जीवनात निर्माण होते. अलीकडेच आय.आय.टी. मुंबईच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जे आहार-विचार-राहणीमान यामधील वैविध्याकडे समावेशक असण्याच्या विचाराविरुद्ध आहे. प्रत्येकाचा आहार वेगळा असतो परंतु तो काही गैरप्रकार नाही, त्या आहार-विचारांचा आदर करण्याचे ‘संस्कार’ करण्याची जबाबदारी पालकच घेऊ शकतात.
हुशार आणि आज्ञाधारक
‘हुशार’ आणि ‘आज्ञा झेलणारी’ मुले शिक्षकांना प्रिय असतात, हे प्रशिक्षण शाळेमध्ये मिळते. नसिरुद्दीन शाह यांना शालेय परीक्षेत गुण कमी मिळत असल्यामुळे शिक्षकांनी स्नेहसंमेलनात होणाऱ्या नाट्याप्रवेशात संधी नाकारली होती. हुशार मुलांनाच शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेण्याची संधी मिळते. त्याच मुलांना ‘सेक्रेटरी’ केले जाते. शाळेच्या कोणत्याही उपक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांची गरज असल्यास अशाच पुढे पुढे करणाऱ्या मुला-मुलींची निवड केली जाते. त्यामुळे शालेय शिक्षकांकडून असा भेदभाव केला जात नसल्याची खातरजमा मुख्याध्यापक आणि शाळेच्या संचालक मंडळाने करण्याची गरज आहे. शाळेचे अनेक उपक्रम सर्वसमावेशक नसतात. शाळेमध्ये ‘लोकमान्य’ टिळक पुण्यतिथी साजरी केली जाते परंतु समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती/पुण्यतिथी साजरी केली जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने/शैक्षणिक संस्थेने उपक्रमांचे विचारपूर्वक नियोजन करण्याची गरज आहे.
आर्थिक स्तर
शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी आर्थिक स्तर असा काही भेदभाव मित्र मैत्रिणी निवडताना करत नाहीत. शालेय व्यवस्था आणि समाज व्यवस्था आर्थिक स्तरानुसार असल्यामुळे ‘इंटरनॅशनल’ शाळेतील मुला-मुलींना वस्तीतल्या मुला-मुलींबरोबर खेळता येत नाही, त्यांचे प्रश्न समजू शकत नाहीत. शहरातील सोसायट्यामध्ये जवळपासच्या परंतु दृष्टीआड असणाऱ्या वस्तीमधून धुण्या-भांड्यासाठी ‘कामगार’ येणे सोयीचे असते. परंतु त्या वस्तीमधील मुले सोसायटीमधील मुलांबरोबर खेळू शकत नाहीत. काही सोसायट्यामध्ये या कामगार वर्गासाठी वेगळी लिफ्ट आहे. शहरातील मुले जवळपासच्या गावातील मुलांना ‘अडाणी’ समजतात. ही पिढी काही वर्षानंतर सार्वजनिक जीवनामध्येही ‘आपल्यातला’ माणूस आपल्या शेजारी असावा अशी अपेक्षा करणार, यात शंका नाही. म्हणूनच पाल्याला तथाकथित ‘इंटरनॅशनल’ स्कूलमध्ये पाठवणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्यासह नियमितपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा उपक्रम हाती घ्यावा. विविध प्रादेशिक आणि देशांच्या भाषेमधील सर्व आर्थिक स्तरांचे प्रश्न मांडणारे चित्रपट आपल्या पाल्यासह बघण्याचा उपक्रम पालकांनी हाती घेऊन चित्रपट बघितल्यावर त्याबद्दल चर्चा केल्यास समाजामधील वैविध्याची तोंडओळख पुढच्या पिढीला होऊ शकते. खरे तर असे चित्रपट नियमितपणे शाळेमध्ये दाखवले जावेत परंतु चित्रपट कलेकडे अजूनही शैक्षणिक व्यवस्था शिक्षणाचे माध्यम या स्वरूपात बघत नाही.
‘आता विश्वात्मके देवे….’ हे पसायदान अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले जाते परंतु त्याचा अर्थ फारच कमी शाळांमध्ये सांगितला जातो. ‘जे खळांची व्यंकटी सांडो….’ याचा अर्थ लक्षात घेऊन शिक्षकांनी तो आचरणात आणणे गरजेचे आहे अन्यथा ‘मैत्र जिवांचे….’ हे फक्त पाठ करण्यापुरतेच मर्यादित राहील. कोणत्याही गुरुने कोणतीही विद्या शिकवताना त्यामध्ये धर्म-जात-लिंग-वय-प्रांत असा कोणताही भेदभाव असलेले ‘प्रवचन’ देणे टाळणे आवश्यक आहे कारण गुरूंच्या अनेक वाक्यांचा शालेय जीवनामध्ये काही वर्षे प्रभाव पडत असतो. त्याचा फायदा घेऊन आपली व्यक्तिगत मते अनेक शिक्षक-प्राध्यापक व्यक्त करतात. ते आपल्या शाळेत टाळले जाते की नाही याची खातरजमा मुख्याध्यापक आणि शाळेचे संचालक यांनी घेणे आवश्यक आहे. प्रबोधन करणाऱ्या एका शाळेने अथर्वशीर्ष पाठ करून शेजार-पाजारच्या दहा घरांमध्ये जाऊन म्हणण्याचा ‘प्रोजेक्ट’ गणेशोत्सव काळामध्ये दिला होता. शाळेचे प्राधान्य पाठांतरापेक्षा कोणत्याही श्लोकाचा अर्थ समजून घेऊन त्यातील विचारांचे बदलत्या काळानुसार आचरण करण्याला असावे. कोणत्याही शाळेने सर्व धर्मांचे उत्सव त्याबद्दल माहितीचे आदान-प्रदान करून साजरे करावेत किंवा कोणतेही धार्मिक उत्सव साजरे करू नयेत. परंपरा पाळण्याचे शिक्षण व्यवस्थेने पालकांवर सोपवावे अन्यथा शाळेने असा उपक्रम हाती घेतल्यास सर्व धर्म-जातीच्या परंपरा साजरे करण्याची जबाबदारी शाळेला घ्यावी लागेल. कोणत्याही देवा-धर्माची प्रार्थना करण्यापेक्षा शाळेची प्रार्थना ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ शिकवणारी असावी.
सुहास किर्लोस्कर








