संकलन, राहूल गडकर
भारत देश हा विविध संस्कृती, शिल्पे, मंदिर स्थापत्य, लेणी, व सुंदर नक्षीकाम असलेल्या वाड्यांनी नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही इतिहासाची व त्याकाळातील संस्कृतीची साक्ष देत उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना म्हणावा अशाच आहेत. अशाच अद्भुत नमुना असलेले खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या स्वर्ग मंडपाचे आकर्षण सर्वांनाच आहे. या मंदिरात असलेले शिल्प, त्यावरील अभूषणे, दिग्पाल याने हे मंदिर नटलेले असल्याचे दिसते. व जगभरातील अनेक पर्यटक प्राचीन काळापासून ते आजपर्यंत येथे येत असल्याचे निदर्शनास येते.
नासिकच्या प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व रत्नागिरीच्या स्नेहन बने यांना दि. २६ मे रोजी कोपेश्वर मंदिराला भेट दिली होती. सोज्वळ साळी यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध शहरात असलेल्या मंदिरात, लेणीमध्ये व टेकडीवर प्राचीन पटखेळ (बैठेखेळ) शोधलेले आहेत. ज्यात नासिकमधील त्रिरश्मी लेणी, गोंदेश्वर मंदिर, अंकाई लेणी, ढग्या डोंगर, त्रिंगलवाडी लेणी, पासून लोणार सरोवराभोवती असलेल्या मंदिरामध्ये तसेच महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर पटखेळ शोधलेली आहेत. काही दिवसांपुर्वी फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यातील हिंजवडी परिसरात असलेल्या मारुंजी टेकडीवर ४१ खेळ तर कापूरहोळ येथे ३५, भोरदरी येथे १७, वैष्णवधाम येथे ३७, तुळजा लेणी येथे २८ असे महाराष्ट्रात ९०० पेक्षा जास्त खेळांचे दस्तऐवजीकरण करण्याचे काम वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या “ प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेंतर्गत” सुरु असून प्राचीन व्यापारी मार्गांवर व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रवास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर या मंदिराच्या सभामंडपात रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व पंचखेलीया या खेळांचे अवशेष सापडले असून त्यांनी प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेत या खेळांची नोंद व दस्तऐवजीकरण करण्यात यश आले आहे.
नवकंकरी या खेळाला मराठीत फरे-मरे या नावानेसुद्धा ओळखले जाते. तर इंग्रजीमध्ये दि मिल गेम, मेर्रील्स, नाईन पेंनी मार्ल, व उत्तर अमेरिकेत कॉवबॉव चेकर्स यानावाने ओळखले जाते. नाइन मेन्स म्हणजे ९ माणसे म्हणजेच हा खेळ २ खेळाडू बसून खेळू शकतात. या खेळाचे इतर ३ प्रकार पाहावयास मिळतात ज्यात ३ मेन्स मॉरिस, ६ मेन्स मॉरिस, १२ मेन्स मॉरिस हे आहेत. या खेळाचे नियम हे फुल्ली-गोळा प्रमाणे असले तरी हा धोरणात्मक खेळ आहे.
पंचखेळीया/पंचखेलीया हा खेळ श्रीलंकेतील विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा खेळ असून हा खेळ बैठे खेळातील शर्यतीचा खेळ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आपण ज्याप्रकारे पचिसी व ल्युडो खेळतो त्याप्रमाणे या खेळाचे नियम आहेत. या दोन खेळांचे अवशेष कोपेश्वर मंदिरात सापडले आहेत. हे संवर्धित व्हावे साळी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यासोबतच असे खेळ कोल्हापुरातील इतर मंदिरात असल्याचेही ते बोलताना म्हणाले.
भारताच्या इतिहासात प्राचीन काळापासून ते २० व्या शतकापर्यंत विविध देशातून व्यापार व्यापारासाठी, युद्धासाठी, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अनेक प्रवासी येऊन गेले आहेत. ज्यावेळी हे प्रवासी, व्यापारी महाराष्ट्रातून गेले त्यावेळी विश्रांतीच्या वेळी व पावसाळ्यात प्रवास न करता एका ठिकाणी मनोरंजन कसे होईल त्यासाठी त्यांच्या देशात असलेले पट-खेळ कोरून ते खेळल्याचे दिसते. सदरील खेळांचा इतिहास पाहता हे खेळ सुमारे २००० वर्षापेक्षा जुने आहेत. आता हे खेळ या मंदिरात कधी कोरले याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. तसेच त्या देशातील पारंपरिक खेळ आपण शिकल्यास यातून धोरणात्मक खेळ नक्कीच खेळता येऊ शकतो. या खेळांचे संवर्धन होण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरून या खेळांच्या शोधात आहे. आजच्या मोबाईल व तंत्रज्ञानाच्या जगामध्ये या खेळांना महत्व देणे काळाची गरज आहे.
सोज्वळ शैलेंद्र साळी, पुरातत्त्वज्ञ व प्राचीन पटखेळ संवर्धक, नासिक