पृथ्वीवरचे अनेक जीव किंवा प्रजाती लोप पावत आहेत, किंवा त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असे आपल्या वाचनात नेहमी येत आहे. त्याचप्रमाणे सजीवांच्या नव्या प्रजातींचा शोधही लागत आहे. यातील कित्येक प्रजाती अनोख्या आणि माणसाला अभ्यास करण्यास उद्युक्त करणाऱ्या असतात.
जपानच्या समुद्रतटावरील प्रवाळांच्या वनात, (कोरल रीफ) नुकताच आठ भुजांच्या एका नव्या जीवाचा शोध लागला आहे. ही प्रजातील आजवर ज्ञात नव्हती, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हातांसारखे आठ अवयव असणारा हा समुद्री प्राणी मार्शल आर्टसारख्या हालचाली करुन आपले भक्ष्य पकडतो, असे दिसून आले आहे. याची त्वचा चांदीसारखी चमकदार असून तो दिसायला आकर्षक असल्याचेही निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे.
त्याचा शोध प्रवाळ आणणाऱ्या पाणबुड्यांना लागला. त्यांनी या नव्याने आढळलेल्या प्रजातीसंबंधी माहिती संशोधकांना दिली. त्यानंतर संशोधकांनी अनेक प्रकारचे संशोधन करुन या नव्या प्रजातीचे स्वरुप नोंद केले. या जीवाच्या सवयी, त्याची भक्ष्य मिळविण्याची पद्धती, आयुष्यमान, रंग, जीवनचक्र, निसर्गात त्याचे असणारे स्थान आणि महत्व इत्यादींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या प्राण्याच्या आठ भुजा हे त्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्या असल्याचे आढळून आले आहे. गेल्या आठवड्यात या नव्या प्रजातीची आतापर्यंत समजलेली माहिती ‘मियामी हेरॉल्ड’ या नियतकालीकात प्रसिद्ध झाली आहे. या जीवावर आणखी संशोधन करण्यात येत आहे.









