‘हॅलो गोंयकार’ कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
पणजी : राज्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे स्थानिक तऊणाईमध्ये किती प्रतिभा आहे याचा साक्षात्कार झाला. कालपर्यंत गोव्याला तब्बल 33 पदके प्राप्त झाली. ही स्पर्धा संपेपर्यंत पदकांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. तसेच या अनुभवाचा फायदा घेऊन भविष्यात हे खेळाडू आंतरराष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरसुद्धा गोव्याचे नाव उज्ज्वल करू शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. त्याशिवाय या स्पर्धांच्या निमित्ताने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या साधनसुविधांचा लाभ सराव आणि अन्य कारणांसाठी कायमस्वऊपी मिळत राहणार आहे, असेही ते म्हणाले.
पणजी दूरदर्शनच्या मासिक ’हॅलो गोंयकार’ या फोन इन लाईव्ह कार्यक्रमातून मुख्यमंत्री गोमंतकीयांशी संवाद साधत होते. गत महिन्यात काही कारणास्तव हा कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले नव्हते, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. राष्ट्रीय क्रीडास्पर्धा राज्यात आयोजित केल्यामुळे प्रत्यक्षात गोव्याला कोणता फायदा झाला, यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. तसेच या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले असून एखाद्या खाजगी विद्यापीठाने रस दाखविल्यास सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
फेरीबोट तिकिटविषयी तोडगा काढू
राज्यात सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेला प्रश्न म्हणजे फेरीसेवेसाठी तिकीट आकारणीचा होता. त्यावरून काही जणांनी मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली. त्यावेळी बोलताना, गेल्या कित्येक वर्षांपासून मोफत सेवा दिल्यामुळे नुकसानीत चालणारी फेरी सेवा आत्मनिर्भर व्हावी या दृष्टीने तिकीट आकारणीचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. परंतु आता काही लोकप्रतिनिधींसह अनेक जणांनी त्याविरोधात मते व्यक्त केली आहेत. त्यांचा विचार करून सर्वमान्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
दिव्यांगांनी स्वयंपूर्ण मित्रांना भेटावे
विविध शारीरिक व्यंगे असलेल्या दिव्यांगांनी गोमेकॉत चांगली वागणूक मिळत नाही, तासनतास ताटकळत ठेवण्यात येते, त्यामुळे त्यांच्या व्याधी अधिक वाढतात, यासारख्या तक्रारी मांडल्या. त्या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी अशा अन्य कोणत्याही समस्या असल्यास संबंधित विकलांग व्यक्तींनी आपल्या संबंधित ग्रामपंचायतीत स्वयंपूर्ण मित्रांना भेटावे, असा सल्ला दिला. अक्षय उर्जा धोरणांतर्गत राज्य सरकारने इंडियन ऑयल कंपनीसोबत करार केला असून पुढील वर्षापर्यंत संपूर्ण राजधानीत सौर उर्जा आधारित स्ट्रीट लाईट बसविण्यात येतील. तसेच ग्रीन सुविधा, पेट्रोल पंपवर मिळून किमान 10 हजार वाहन चार्जिंग स्टेशन्स, राज्यात विविध ठिकाणी प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प उभारणे यासारखी कामे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पाण्याच्या समस्यांवर आठ दिवसांत उपाय
राज्यात अनेक पंचायत क्षेत्रात अद्याप जलवाहिनीच टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ’हर घर जल’ योजनेला काय अर्थ राहतो? असा सवाल बेतकी येथील पांडुरंग नाईक यांनी विचारला. तसेच बामणवाडो शिवोली येथे कित्येक महिन्यांपासून लोकांना पाणीच मिळत नाही, अशी तक्रार अपर्णा नाईक यांनी मांडली. 1997 पासून सांताक्रूज येथे राहणाऱ्या विश्वनाथ सालेलकर यांनीही असाच प्रश्न उपस्थित केला. त्या सर्वांवर पुढील आठ दिवसात उपाय आखण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दलही अनेक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आता पाऊस थांबलेला असल्यामुळे लवकरच दुऊस्तीकामे हाती घेण्यात येतील, असे सांगितले. पर्यटन व्यवसाय सुरळीत आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्यात आलेल्या पर्यटकाची कोणत्याही प्रकारे सतावणूक किंवा लूट होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल, असे सांगून यापुढे असे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. पर्यटकांना अधिक सुविधा देतानाच स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने ’होम स्टे’ धोरणाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटकांनी अॅप आधारित टॅक्सी आणि अन्य सेवांचा आधार घ्यावा, सोशल मिडीया सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही ते म्हणाले. भविष्यात या क्षेत्रात खाजगी सरकारी भागिदारीचाही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अॅप्रेन्टिसशीपच्या युवकांनी जाहिरातीकडे लक्ष ठेवावे
सरकारने अंमलबजावणी केलेल्या मुख्यमंत्री अॅप्रेन्टिसशीप योजनेंतर्गत विविध सरकारी खात्यांनी काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या जाहीरातींकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार अर्ज करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. यापुढे कोणत्याही सरकारी नोकरीसाठी पूर्वप्रशिक्षण सक्तीचे करण्यात येईल व त्या दृष्टीने या प्रशिक्षणाचा उमेदवारांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. सुमारे तासभर चाललेल्या या संवादादरम्यान पर्रा येथील आगुस्तीन डायस, दिवाडी येथील जॅरी डिसोझा, शिवनाथ नागेशकर (नागेशी), जमीर म्हाबळकर (डिचोली), ऑस्टीन फर्नांडीस (वास्को), सागर गांजेकर – कुळें, जयेंद्र नाईक – मडगाव, निकिता मांद्रेकर – सांखळी, शंकर कवठणकर – दाबोळी, कविज्ञा नाईक – फोंडा, गंगाधर रायकर – केपे, विकास पागी – काणकोण, प्रशांत पाटील – फोंडा, शैलेंद्र सरदेसाई – कारापूर, वामन फडते – चोडण, विराज सप्रे – फोंडा, रामचंद्र मराठे – साळ, प्रज्ञा मांद्रेकर – सांखळी, सचिन शिंगाडे – डिचोली, आशिश नाईक – रायबंदर, तृप्ती रेडकर – मडगाव, आदींनी आपले प्रश्न, समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. अक्षता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.