शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम : डिस्टन्स मोड-ऑनलाईन मोड अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार
बेळगाव : सीमाभागातील विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाने संधी उपलब्ध करून दिली आहे. नोकरी, व्यवसाय करीत ऑनलाईन व दूर शिक्षण पद्धतीने या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. माफक फी, फीमध्ये उच्चशिक्षण घेण्याची संधी असून सीमाभागातील विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत 10 टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलगुरु विनय शिंदे यांनी दिली. गोवावेस येथील तुकाराम महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. व्यासपीठावर दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण विभागाचे समन्वयक चांगदेव बंडगर, साहाय्यक प्रा. डॉ. सचिन भोसले, मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमएस्सी गणित, एमबीए (डिस्टन्स मोड), तसेच नव्याने सुरू करण्यात आलेले एमकॉम, एमएस्सी (गणित), एमबीए (ऑनलाईन मोड) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. 15 सप्टेंबरपूर्वी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी निपाणी किंवा कोल्हापूर येथील अभ्यासकेंद्रांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगाव शहरासह खानापूर व बेळगाव तालुक्यातील विद्यार्थी उपस्थित होते. अभ्यासक्रम प्रवेशाविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, बाबू कोले, उमेश पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.









