नागरिकांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा : गावापर्यंत रेशन पुरवठा करण्याची मागणी
खानापूर : शिरोली ग्राम पंचायत क्षेत्रातील जामगाव, देगाव, पाली, कृष्णापूर, व्हळदा, मेंडील या गावातील ग्रामस्थांना महिन्याचे रेशन घेताना बायोमेट्रिक पद्धत अवलंबली जाते. मात्र बायोमेट्रीकमुळे या दुर्गम भागातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यासाठी दुर्गम भागातील बायोमेट्रीक पद्धत रद्द करून रेशन पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी दुर्गम भागातील नागरिकांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून यावर तातडीने तोडगा काढू, असे सांगितले.
तालुक्यातील शिरोली ग्रा. पं. हद्दीतील पाली, मेंडील, कृष्णापूर, देगाव, तळेवाडी, व्हळदा भागातील लोकांना महिन्याचे रेशन मिळवण्यासाठी हेम्माडगा येथे दहा-बारा कि. मी. चालत यावे लागते. त्यातच या भागात वीजपुरवठा खंडित असतो. तसेच मोबाईलला नेटवर्क नसल्याने बायोमेट्रिक घेण्यात येत नाही. बायोमेट्रिकसाठी ग्रामस्थांना जंगलातून चालत यावे लागते. त्यानंतर पुन्हा रेशनसाठी यावे लागते. यासाठी बायोमेट्रिक पद्धत रद्द करावी आणि गावापर्यंत रेशन पुरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत यापूर्वीही अनेकवेळा निवेदने दिली आहेत. मात्र अन्न पुरवठा विभागाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बायोमेट्रीक घेण्यात वीजपुरवठा आणि नेववर्कच्या व्यत्ययामुळे अनेक अडचणी येतात. परिणामी या दुर्गम भागातील लोकांना महिन्याचे रेशन मिळवण्यासाठी नाहक हेलपाटे मारावे लागतात. पावसाळ्यात जंगलातून चालत येणे धोकादायक असल्याने महिन्याच्या रेशनसाठी जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागत आहे. यासाठी शिरोली ग्रा. पं. चे सदस्य दीपक गवाळकर, विजय मादार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी पंडित ओगले, प्रकाश गावकर, नारायण गावकर, महादेव गावकर, अनंत गावडे, सुरेश देसाई, बाबुराव गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. आठ दिवसात बायोमेट्रीक पद्धत रद्द न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.









