रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे : चिखलाचे साम्राज्य : स्वच्छतागृहाची कमतरता : शासनाने त्वरित लक्ष घालण्याची मागणी
बेळगाव : शहराला सर्वाधिक कर देणाऱ्या उद्यमबाग परिसरात पायाभूत सुविधा नसल्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. काही ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली असल्याने चिखलामध्ये वाहने अडकून मालाची ने-आण करणे अवघड होत आहे. त्याचबरोबर कचऱ्याची रोजच्या रोज उचल होत नसल्याने उद्योजक वैतागले आहेत. बेळगाव शहराची औद्योगिक वसाहत म्हणून उद्यमबाग परिसराला ओळखले जाते. अनेक लहान मोठे उद्योग या ठिकाणी असून त्यांनी दिलेल्या करातून शहराचा आर्थिक गाडा हाकला जातो. परंतु, याच परिसराला पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून मागणी केल्यानंतर काही ठिकाणी काँक्रिटचे रस्ते करण्यात आले. परंतु, उर्वरित भागात मात्र अद्यापही चिखलातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे. उद्यमबाग, अनगोळ औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज हजारो कामगार काम करीत आहेत. या ठिकाणी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याची तक्रार वारंवार करण्यात येते. सध्या केवळ एकच स्वच्छतागृह औद्योगिक वसाहतीत उपलब्ध आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याने कामगारांना दुर्गंधी तसेच डासांचा रोज सामना करावा लागतो.
लाला माती टाकल्याने चिखल
उद्यमबाग-मजगाव कॉर्नर परिसरात लाल माती टाकण्यात आल्याने मोठा चिखल झाला आहे. या ठिकाणी वाहने अडकून पडत असल्याने ये-जा करणेही अवघड जात आहे. काही दिवसांपूर्वी साहित्य भरून आलेला ट्रक या चिखलामध्ये रुतला. बऱ्याच वेळानंतर तो बाहेर काढण्यात यश आले. परंतु, या सर्वांमध्ये उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते बुजवण्याची मागणी केली जात आहे. उद्यमबाग परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. मुख्य मार्गावरील तेवढाच कचरा जमा केला जातो. आतील भागातील कचऱ्याची योग्यप्रकारे उचल होत नसल्याची तक्रार उद्योजकांतून केली जात आहे. त्यामुळे उद्यमबाग परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असल्याचे चित्र दिसत आहे.









