बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत डॉ. साईश देशपांडे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
लोककला हा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहे. यातूनच विचारसरणी आणि संस्कृती प्रकट होते. याबरोबर कलाकारांची अभिव्यक्ती दिसून येते. लोककलेमध्ये गीत, नृत्य, नाटय़, संगीत यांची सामूहिकता महत्त्वाची असते. शिवाय कला आणि तालालाही तितकेच महत्त्व आहे, असे विचार गोवा येथील डॉ. साईश देशपांडे यांनी मांडले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘गोव्यातील लोककला ः स्वरुप आणि आविष्कार’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, सहकार्यवाह लता पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक आणि परिचय करून दिला.
डॉ. साईश देशपांडे पुढे म्हणाले, निसर्गाशी संवाद साधत जगणाच्या लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंध येतात. त्यातूनच कलात्मक आविष्कार दिसतात. नवीन प्रयोग सादर होतात, तेव्हा त्यातून नवनिर्मिती होत असते. गाण्यातून एखादा प्रसंग उभा करणे आणि संवाद घडविणे ही नाटय़ाची खासियत आहे. यावेळी चित्रफितीद्वारे वेगवेगळय़ा कला, संस्कृतींची माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांच्या ओव्या आणि गाणी ऐकविली.
शोध व विधायक पत्रकारितेसाठी केलेल्या उत्तम कार्याबद्दल उत्कृष्ट पत्रकार म्हणून दै. तरुण भारत गोव्याचे निवासी संपादक सागर जावडेकर व कन्नड विभागातून न्यूज हंटचे वार्ताहर चंद्रशेखर चिनकेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रोख 5 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याबरोबर महिलांसाठी वसुधा सांबरेकर व रश्मी एस. यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबरोबर एम. ए. मराठीमध्ये तेजस्विनी कांबळे व बी. ए. साठी सोनाली बिर्जे यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव केला. यावेळी रसिक श्रोते उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले. लता पाटील यांनी आभार मानले.









