वृत्तसंस्था /टोकियो
जपानने फुकुशिमा आण्विक प्रकल्पातील किरणोत्सर्गी पाणी प्रशांत महासागरात सोडण्यास सुरुवात केली आहे. जपानी प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी 1.03 वाजता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान सर्व स्थितींची पडताळणी करण्यात आली आणि यात कुठलीच गडबड आढळून आलेली नाही. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करणारा पंप 24 तास सक्रीय राहणार असल्याची माहिती आण्विक प्रकल्पाची देखभाल करणारी कंपनी टेप्कोने दिली आहे. 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे फुकुशिमा आण्विक प्रकल्पात भयंकर विस्फोट झाला होता. तेव्हापासून या प्रकल्पात 133 कोटी लिटर किरणोत्सर्गी पाणी जमा आहे. या किरणोत्सर्गी पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने जपान आता ते प्रशांत महासागरात सोडत आहे. आण्विक प्रकल्पात जमा असलेल्या पाण्यात किरणोत्सर्गी सामग्रीचा अंश असला तरीही त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. किरणोत्सर्गी पाण्यात अद्याप ट्रायटियमचे कण आहेत. किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यात आल्याने ते सागरी खाद्याद्वारे मानवी शरीरात पोहोचू शकते अशी भीती चीन अन् दक्षिण कोरियाला सतावत आहे. ट्रायटियम शरीरात शिरल्याने कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका वाढू शकतो.









