सांगली :
गेल्या आठवड्यापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यातही वेगाने वाढ होऊ लागल्याने शुक्रवारी सकाळी धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. धरणातील साठ्यात वाढ होऊ लागल्याने कोयना, वारणा आणि अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
शुक्रवारी दिवसभरात नवजा, महाबळेश्वर आणि कोयना परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चोवीस तासात सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना परिसरात 87, नवजामध्ये 98 आणि महाबळेश्वरमध्ये 94 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात दिवसभरात तब्बल 4.41 टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणाचा साठा 33.46 टीएमसीवर पोहोचला आहे.
तर वारणा धरण 53 टक्के भरले असून या धरणातून 1590 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाटबंधारेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अलमट्टी धरणातही 50 हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू झाल्याने या धरणातील पाणीसाठा 68.34 टीएमसी झाला आहे. परंतु या धरण व्यवस्थापनाने दोन दिवसांपूर्वी केलेला विसर्ग 70 हजारावरून 50 हजारापर्यंत कमी केला आहे.
सांगली, मिरज परिसरासह जिल्हयाच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सांगलीत सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्हयात सरासरी 4 मिमी पावसाची नोंद झाली. परंतु दिवसभर अनेक भागात पाऊस झाला.








