जिल्हा बांधकाम कामगार संघटनेची मागणी : कामगार खात्याला निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन वर्षापासून बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कित्येक वेळा राज्य सरकार आणि कामगार कल्याण मंडळाकडे निवेदने सादर करून देखील दुर्लक्ष झाले आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने सुधारित शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे.
बांधकाम कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या हित जपावे यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र, बांधकाम कामगारांना त्या मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, कामगारांच्या मुलांच्या विवाहाचे पैसे वेळेत मिळत नसल्याने कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक कामगार लेबरकार्डच्या प्रतीक्षेत
पीयुसीच्या विद्यार्थ्यांना अद्याप लॅपटॉपचे वाटप झाले नाही. त्यामुळे विद्यार्थीही प्रतीक्षेत आहेत. त्याबरोबर अनेक कामगार लेबरकार्डच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. तर काही कामगारांचे विनाकारण लेबरकार्डसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक कामगारांना योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. त्याबरोबर बांधकाम कामगारांना घरे बांधण्यासाठी देण्यात येणारी पाच लाखांची मदतही पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कामगारांचे घरकुलाचे स्वप्न अधुरे राहिले. कामगारांना मिळणाऱ्या सुविधा तातडीने मिळाव्यात, अशी मागणीही संघटनेतर्फे केली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, चंद्रकांत मालाई, मारुती चौगुले, प्रशांत हेरेकर यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.









