घर, भिंती कोसळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगावसह पश्चिम घाटामध्ये मागील आठ दिवसांत धुवाधार पाऊस झाला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. काही सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून आपत्कालीन मदतीसाठी अग्निशमन व एनडीआरएफचे जवान सज्ज आहेत. विशेषत: चिकोडी, निपाणी येथील नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून कोणतीही समस्या जाणवल्यास आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरसदृश्य परिस्थिती जाणवल्यास प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन विभाग तयार केला जातो. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफ, एसडीआरएफ व अग्निशमन विभाग एकत्रितरित्या काम करत असतात. पुरामुळे एखाद्या गावाला अथवा भागाला धोका निर्माण झाल्यास तेथील नागरिकांना हे जवान बाहेर काढत असतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने चिकोडी परिसरात महापूर आला होता. वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा, घटप्रभा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने त्यावेळी आपत्कालीन विभागाने मोठी कामगिरी केली. मागील आठ दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम घाटात सुरू असणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे आपत्कालीन विभाग पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे समस्या आढळल्यास आपत्कालीन विभागाला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
समस्या असल्यास त्वरित संपर्क साधावा – व्ही. एस. टक्केकर (अग्निशमन ठाणाधिकारी)
पावसाचे प्रमाण वाढत असून नद्या दुथडी भरून वाहात आहेत. अशा वेळी नागरिक पाण्यामध्ये अडकणे, घर अथवा भिंती कोसळणे यावेळी अग्निशमन विभाग कार्यरत असतो. नागरिकांनी समस्या असल्यास त्वरित अग्निशमन विभागाशी 0831-2429441 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
बेळगाव अग्निशमन विभागाचा ताफा
अधिकारी व अग्निशमन जवान-50
- पाण्याचे बंब – 4
- रेस्क्यु व्हॅन-1
- क्वीक रिस्पॉन्स व्हॅन-1
- अग्नि (बुलेट)-1
आपत्ती निवारण (पूरजन्यस्थिती)
- मशिनबोट-1
- रबरबोट-2
- ऑस्कर लॅम्प-1
- लाईफ जॅकेट









