बांगलादेश सुधारू पाहतोय स्वत:ची स्थिती : मोहम्मद युनूस यांच्याकडून धोरण बदलाचे संकेत
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात सत्तापालटानंतर अंतरिम सरकार अनेक प्रकरणांमध्ये भारताच्या विरोधात दिसून येत होते. तर दुसरीकडे बांगलादेशने पाकिस्तानसोबतची जवळीक वाढविण्यास सुरुवात केली होती. परंतु काही दिवसातच वस्तुस्थितीची जाणीव झाली आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचा पाकिस्तानाबद्दल अपेक्षाभंग झाला. आता बांगलादेश भारत, नेपाळ आणि भूतानसोबत मिळून स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्याची योजना आखत आहे. भारत, नेपाळ आणि भूतानसोबत मिण्tन संयुक्त अर्थव्यवस्था निर्माण करू इच्छितो, असे उद्गार मोहम्मद युनूस यांनी काढले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करणे प्रकर्षाने टाळले आहे.
पाकिस्तानची खालावलेली अर्थव्यवस्था पाहता त्याच्याकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा बांगलादेश करणार नाही. अशास्थितीत बांगलादेश पाकिस्तानला स्वत:च्या या योजनेत सामील करू इच्छित नाही. भारत, भूतान आणि नेपाळ हे देश एकत्र आले तर त्यांनाही लाभ होईल. याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आमच्याकडे मोठी लोकसंख्या असून याचा वापर अर्थव्यवस्थेसाठी केला जाऊ शकतो असे युनूस यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे विदेश विषयक सल्लागार तौहीद हुसैन यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांकडून द्विपक्षीय संबंध अन् बिम्सटेकवर चर्चा झाली. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक कोऑपरेशनमध्ये (बिम्सटेक) 7 देश असून यात बांगलादेश, भारत, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, भूतान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. बांगलादेश आगामी बिम्सटेक शिखर परिषदेचे अध्यक्षत्व सांभाळणार आहे. ही परिषद 2-4 एप्रिल या कालावधीत बँकॉक येथे पार पडणार आहे.









