सध्या नव्या कार्डांसाठी अर्ज नाही : मंत्री मुनियप्पा यांची माहिती
बेंगळूर : रेशनकार्डांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. एपीएल, बीपीएल कार्डांसाठी अर्ज दाखल करण्याची लिंक आम्ही ओपन केलेली नाही. याचे कारण लवकरच स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली आहे. त्यामुळे नवे रेशनकार्ड बनवून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची निराशा झाली आहे. राज्य सरकारने ‘अन्नभाग्य’ योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यात बीपीएल रेशनकार्डे बनवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. यापूर्वी सरकारने नवी बीपीएल कार्डे वितरणासाठी लवकरच अर्ज मागविले जातील, असे सांगितले होते. मात्र, सध्यातरी नव्या रेशनकार्डांसाठी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे मंत्री मुनियप्पा यांनी सांगितले आहे. शुक्रवारी बेंगळूरमधील विधानसौध येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू
पुढील महिन्यात रेशनअंतर्गत अन्नभाग्य योजनेतील अतिरिक्त तांदूळ वितरणासाठी डेडलाईन देता येणार नाही. अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. राज्याला तांदूळ पुरवठा करण्यासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्ये पुढे आली आहेत. दराविषयी देखील चर्चा होत आहे. दोन्ही राज्यांचे अधिकारी समोरासमोर बसून दर निश्चित करत आहेत. येत्या 10 दिवसांच्या आत तांदळाच्या दराबाबत निर्णय होईल. मात्र, पुढील महिन्यात तांदूळ केव्हा वितरण होईल, हे आताच सांगणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिक्त 2,181 पदांची भरती
अन्न-नागरी पुरवठा खात्यातील 2,181 रिक्त पदांची भरती करण्याची सूचना खात्याच्या आयुक्तांना आणि सचिवांना देण्यात आली आहे. तालुका पातळीवर स्वतंत्र आहार कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरांची नेमणूक करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
तांदळाऐवजी ज्वारी, नाचणा
अन्नभाग्य योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदूळ, ज्वारी, नाचण्याचा दर्जा तपासून विलंबाने का होईना, वितरण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ज्या भागात तांदळाचा वापर कमी होतो, त्या भागातील लोकांना नाचणा किंवा ज्वारी वितरण करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
26 ऑगस्टपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा होणार
अन्नभाग्य योजनेतील अतिरिक्त तांदळाऐवजी लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास विलंब झाला होता. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने पैसे जमा करण्यास विलंब झाला होता. ऑगस्ट महिन्यातील अतिरिक्त तांदळाऐवजी दिली जाणारी रक्कम 25, 26 ऑगस्टपूर्वी लाभार्थींच्या खात्यावर जमा होणार आहे, असे मुनियप्पा यांनी सांगितले.
7 लाख कार्डधारकांची माहिती दुरुस्त
राज्यात 1.28 कोटी रेशनकार्डांपैकी 1 कोटी बीपीएल कार्डधारकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित 21 लाख लाभार्थींच्या बँक खात्याचा तपशिल रेशनकार्डाशी जुळलेला नाही. यापैकी 7 लाख कार्डधारकांची माहिती दुरुस्त करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.









