वृत्तसंस्था/ बुडा पेस्ट
विश्व अॅथलेटिक फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सकडून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी साफ निराशा झाली. पुरुषांच्या 400 मी. अडथळा शर्यतीच्या उपांत्यपूर्व फेरीत टी. संतोषकुमार तसेच पुरुषांच्या उंच उडी पात्र फेरीमध्ये सर्वेश कुशारे यांना दर्जेदार कामगिरी करता आली नाही.
रविवारी पुरुषांच्या 400 मी. अडथळा शर्यतीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये टी. संतोषकुमारने 50.46 सेकंदाचा अवधी घेतल्याने त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारामध्ये पाच विविध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत घेण्यात आल्या आणि त्यामध्ये चार जलद वेळ नोंदवणाऱ्या धावपटूंची उपांत्य फेरीसाठी पात्रता राहिली असल्याने संतोषकुमारचे आव्हान संपुष्टात आले.
पुरुषांच्या उंची उडी क्रीडा प्रकाराच्या पात्र फेरीमध्ये भारताच्या सर्वेश कुशारेने 2.25 मी. ची उंच उडी घेत 11 वे स्थान मिळवले. या स्पर्धेच्या शनिवारी पहिल्या दिवशी भारताच्या अविनाश साबळेला 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. पुरुषांच्या 20 कि.मी चालण्याच्या शर्यतीत भारताच्या तीन धावपटूंनी अंतिम फेरी गाठली आहे.









