वृत्तसंस्था / समोकोव्ह (बल्गेरिया)
येथे सुरू असलेल्या 20 वर्षांखालील वयोगटातील विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या तीन ग्रीको रोमन मल्लांचे आव्हान पात्रता फेरीतच समाप्त झाले. 67 किलो गटात अनुज, 97 किलो गटात नमन यांना प्राथमिक फेरीतच प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. भारताचे अन्य पाच मल्ल पदक फेरीसाठी लढत देतील.
67 किलो गटात चीनच्या लियुने भारताच्या अनुजचा 9-0 अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव केला. 97 किलो वजन गटात उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाचा रॉडीनने भारताच्या नमनचा 2-1 अशा गुणफरकाने पराभव केला. पुरुषांच्या 72 किलो वजन गटात इजिप्तच्या मोहम्मद इब्राहीमने भारताच्या विनीतचा तांत्रिक सरस गुणावर पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. पुरुषांच्या 55 किलो वजन गटात अझरबॅजानच्या देसडेमोरोव्हने भारताच्या अनिल मोरचा एकतर्फी पराभव केला.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात 72 किलो गटात भारताच्या काजल हिने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून ती आता सुवर्णपदकासाठी लढत देईल. तसेच 50 किलो गटात श्रुती आणि 53 किलो गटात सारिका या भारतीय महिला मल्ल कांस्यपदकासाठी लढत देतील. त्याचप्रमाणे पुरुषांच्या विभागात 60 किलो गटात ग्रिकोरोमन मल्ल सुरज व 72 किलो वजन गटात प्रिन्स कांस्यपदकासाठी लढत देतील.









